मुंबई- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेत नाही. हल्लीच अचानक नाव घ्यायला सुरुवात केली आहे. व्यासपीठावरही फक्त शाहू-फुले-आंबेडकरांच्या प्रतिमा. पण ज्यांच्या प्रेरणेवर शाहू-फुले-आंबेडकर विचार आहे त्या आमच्या शिवछत्रपतींची प्रतिमाही कुठे नसायची, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरेंच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांना स्वतः चे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही. त्या नैराश्यातून शरद पवारांवर बोलतात, अशी टीका महेश तपासे यांनी केली. तसेच राज ठाकरेंचे वक्तव्य चुकीचे आहे, लोकांची दिशाभूल करणारे आहे. शरद पवार हे व्यक्तीमत्व काय आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट सांगितले.
दरम्यान, जातीपातीच्या पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. काही जण राजकीय स्वार्थासाठी इतिहास वापरात आहेत. राष्ट्रवादीच्या जन्मापासून, साल १९९९ पासून महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरु झालं, असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे. मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचं, असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला.