Join us

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने केली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 7:54 AM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : मी पक्षाध्यक्ष ठरवू शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादीतील पक्षाध्यक्षाची निवड ही योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही. दोन्ही गटांनी याबाबत दावे केले आहेत. मात्र, असे असले तरी पक्षांतर्गत वादात पक्षाचा अध्यक्ष कोण, हे मी ठरवू शकत नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, तर दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. तसेच पक्षाध्यक्षपदी आता जे आहेत, त्यांची निवड योग्य प्रक्रियेनुसार झाली नसल्याचाही दावा दोन्ही गटांनी केला होता. ३० जून २०२३ रोजी अजित पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला होता. यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे ३० जून रोजीच स्पष्ट झाले होते. अजित पवारांची निवडणूक पक्षघटनेच्या विरोधी आहे, असा दावा शरद पवार गटाने केला आहे. पक्षाचा अध्यक्ष कोण आहे? हे मी ठरवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटाने सादर केलेल्या दस्तऐवजाला शरद पवार गटाने आव्हान दिलेले नाही. त्यामुळे बहुतांश सदस्यांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचे सिद्ध होते. त्यामुळेच पक्षाचे तेच नेते आहेत, असा निष्कर्ष निघत असल्याचेही नार्वेकर म्हणाले.

निकालाची प्रत मिळाल्यानंतर वाचून मी सविस्तर प्रतिक्रिया देईन.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

निवडणूक आयाेगाने अजित पवार गटावरच शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या निकालाची अपेक्षा होतीच. कुणाला अपात्र करा, अशी आमची मागणी नव्हती. आम्हाला अपात्र करू नका, एवढीच आमचीमागणी होती.- छगन भुजबळ,मंत्री, नेते राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतला त्यावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले आहे. आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस. आयोगाने दिलेला निकाल आणि या निर्णयानंतर आमचा निर्णय योग्य ठरला आहे. विधानसभा अध्यक्षांनी कायदेशीर विचार करून निकाल दिला आहे.- सुनील तटकरे,प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

हा निर्णय अदृश्य शक्तीने दिला तो अध्यक्षांनी कॉपी पेस्ट केला. प्रादेशिक पक्षांची भाजपाकडून गळचेपी सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न आहे.- खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या निकालात कुणालाही अपात्र ठरवले नाही. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्ष कुणाचा याबाबत निर्णय दिला. पक्ष फक्त विधानसभेच्या सदस्याच्या जीवावर होऊ शकतो, हा नवा प्रकार या निर्णयात दिसतोय. मला खात्री आहे की, सुप्रीम कोर्ट हे मान्य करणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई केसवर आधीच भाष्य केलेले आहे.- आ. जयंत पाटीलप्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट

१०व्या परिशिष्टाचा आधार घेऊनच निकाल

संविधानात दिलेल्या तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि अपात्रतेच्या संदर्भातील नियमांच्या आधारावर मी हा निर्णय दिला आहे. अत्यंत सुस्पष्ट भाषेत निकाल जाहीर केला आहे. तसेच हा निकाल देताना मी जी कारणे दिली आहेत ती कायद्याच्या कसोटीवर योग्य आहेत. ज्या लोकांना १०व्या परिशिष्टाची माहिती नाही तेच लोक टीका करीत आहेत. मी घटनेतील १०व्या परिशिष्टाचा आधार घेऊनच हा निकाल दिला आहे. ज्यांना घटनेतील काही कळत नाही, त्यांनी यावर वक्तव्य करणे आणि त्यांच्या वक्तव्यांवर मी प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही.- राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष.

 

टॅग्स :राहुल नार्वेकरराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार