Join us  

"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 8:23 PM

आज लोकसभा अधिवेशनात राष्ट्रवादीवरुन खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. 

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले, राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले. तर महायुतीला कमी जागा मिळाल्या. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाला आठ जागा मिळाल्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान, आता खरी राष्ट्रवादी कोणाची यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज लोकसभा अधिवेशनात राष्ट्रवादीवरुन खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजनल संस्थापक आणि आमचे प्रिय नेते शरद पवार अशी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदारांच्यावतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार

यावेळी सुप्रिया सुळे यांच्या भाषणानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख केला. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट करुन खासदार सुनिल तटकरे यांना डिवचले आहे.

या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये खासदार सुनिल तटकरे यांना डिवचले आहे."फक्त तोंडाने बोलून कोण ओरिजनल होत नसतं. ब्रँड हा ब्रँड असतो. राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची अनेकांना इच्छा असली तरी बारामती आणि शिरुरच्या जनतेने ओरिजनल ब्रँडची ओळख दाखवून दिली. जर तुतारी वाजवणारा माणूस रायगडमध्ये उभा केला असता तर संसदेत मागच्या दाराने घुसण्याची वेळ आली असती", अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारशरद पवार