देशभरात ‘ऑपरेशन मिडनाइट’, १५ राज्यांत ९६ ठिकाणी छापे; अशी झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 10:45 AM2022-09-23T10:45:10+5:302022-09-23T10:46:01+5:30

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर १५ राज्यांत ९६ ठिकाणी छापे , ईडी, एनआयए, एटीएसने केली संयुक्त कारवाई 

Nationwide 'Operation Midnight', raids at 96 locations in 15 states | देशभरात ‘ऑपरेशन मिडनाइट’, १५ राज्यांत ९६ ठिकाणी छापे; अशी झाली कारवाई

देशभरात ‘ऑपरेशन मिडनाइट’, १५ राज्यांत ९६ ठिकाणी छापे; अशी झाली कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई/नवी दिल्ली :  दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, त्यासाठी निधी उभारणे, तरुणांना अशा कारवायांत सहभागी करून घेणे, या मुद्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य पोलीस यंत्रणा यांनी पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर गुरुवारी मध्यरात्रीपासून संयुक्तपणे केलेल्या देशव्यापी कारवाईत १०६ जणांना अटक केली. ‘ऑपरेशन मिडनाइट’ नावाने ही  कारवाई झाली. तपास यंत्रणांनी एकत्रित येत दहशतवादाविरोधात केलेली ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. 

पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर आणि पदाधिकाऱ्यांच्या घरावर ही छापेमारी झाली. त्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून १५० मोबाइल आणि ५० लॅपटॉप, तसेच अनेक संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे तपास यंत्रणांनी ताब्यात घेतली आहेत. 

कशी झाली कारवाई?
या कारवाईची दिशा १९ सप्टेंबर रोजी ठरली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी, एनआयए, ईडी, आयबीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. तीत कारवाई करण्याचे निश्चित झाले. रात्री एक वाजता सुरू झालेली कारवाई पहाटे पाचपर्यंत चालली. सहा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. 

मनी लाँड्रिंगमुळेच ईडीही सहभागी
पीएफआय संघटना यापूर्वीही ईडीच्या रडारवर आली होती. १ जून रोजी ईडीने पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी पीएफआयच्या २३ बँक खात्यांत असलेली ५९ लाख रुपयांची रक्कम जप्त झाली होती. पीएफआयच्या खात्यात २००९ पासून सुमारे ३० कोटी रुपये जमा झाल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले होते. त्याचवेळी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

कुठे किती जणांना अटक?

महाराष्ट्र    २० 
दिल्ली    ३
आंध्र प्रदेश     ५
आसाम     ९
कर्नाटक     २० 
केरळ     २२ 
मध्य प्रदेश    ४
पुद्दुचेरी     ३
राजस्थान     २
तामिळनाडू     १० 
उत्तर प्रदेश     ८

राज्यात एटीएसकडूनही धरपकड
मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेच्या नेतृत्वाखाली राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्यांची धरपकड सुरू असताना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पीएफआयच्या २२ कार्यकर्त्यांना जेरबंद केले. बेकायदा कृत्ये, समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारणे याअंतर्गत चार गुन्हे दाखल करण्यात आले.

२३ राज्यांत पीएफआय
पीएफआयची स्थापना ९ नोव्हेंबर २००६ रोजी केरळ येथे झाली. संस्थेने २३ राज्यांत विस्तार केला आहे. 

Web Title: Nationwide 'Operation Midnight', raids at 96 locations in 15 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.