मुंबई : पंडित शैलेश भागवत यांनी सनईतून राष्ट्रगीत साकारत, भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मानसपुत्र आणि उस्तादांचे लाडके शिष्य म्हणून नावाजलेले भागवत यांनी, सोशल मीडियावर चित्रफीत प्रदर्शित केली असून, ही चित्रफीत नेटिझन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आगामी मार्च महिन्यात खान यांची जन्मशताब्दी वर्षपूर्ती आहे. खान यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनोख्या पद्धतीने सनईतून श्रद्धांजली दिली. पंडित शैलेश भागवत यांनी ३९ वर्षे खान साहेबांकडे सनईवादनाचे धडे गिरवले. खानसाहेबांनी स्वत: भागवत यांना ‘दुसरा बिस्मिल्लाह’ असा सन्मान बहाल केला. आपल्या गुरूंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना जन्मशताब्दीची श्रद्धांजली म्हणून भागवत यांनी हे राष्ट्रगीत सादर केले. युनिटी ग्रुप्स इंडियाच्या वतीने उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना सुरांची श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीत वादन या प्रकल्पाची संकल्पना आणि दिग्दर्शन युवा कलाकार शुभंकर करंडेने केले आहे, तर युवा संगीतकार मयूरेश अधिकारीने संगीत संयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रगीतातून सनई उस्तादाला ‘श्रद्धांजली’
By admin | Published: January 26, 2017 3:49 AM