मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय मैदान सोडणार नाही; रिफायनरीविरोधात नाणारवासीय आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:37 PM2018-11-27T19:37:54+5:302018-11-27T19:40:09+5:30
भूसंपादन अध्यादेश रद्द करण्याची मागणी
मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आज आझाद मैदानातील धरणे आंदोलनात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याची घोषणाच रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने केली आहे. रात्रीच्या वेळेस मैदानात थांबता येत नसल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सलग पाचव्या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यास मुख्यमंत्री तयार नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांचा विरोध समजून घेत जबरदस्तीने प्रकल्प लादणार नसल्याची ग्वाही दिली होती. मात्र तरीही काही एनजीओ मार्फत दलाल व गुंडांची मदत घेत प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार नितेश राणे, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांसह विविध नेते आज व्यासपीठावर आले होते.
संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सांगितले, की उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्यासाठीची कागदपत्रे उच्चस्तरीय समितीकडे एप्रिल महिन्यात दिलेली आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या उच्चस्तरीय समितीने आजपर्यंत फाईलवर काहीही कार्यवाही केलेली नाही. याचाच अर्थ जनतेचा आक्रोशाकडे मुख्यमंत्री पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ग्रामस्थांना शाश्वत जीवनशैली आणि उपजीविका हवी आहे. त्यामुळे हा विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी वालम यांनी केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाची टाळाटाळ
मुख्यमंत्री कार्यालयाकडे चर्चेसाठी वेळ मागितली असता उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा करण्यास सांगितले जाते. याउलट उद्योगमंत्र्यांनी याआधीच अध्यादेश रद्द करण्याची कागदपत्रे उच्च स्तरीय समितीकडे पाठवली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशिवाय अन्य कोणताही मंत्री हा प्रश्न सोडवू शकत नाही. तरीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून चर्चेसाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
अटक केली, तरी उठणार नाही!
मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली नाही, तर एक दिवसाचे धरणे आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. नियमानुसार आझाद मैदानात रात्रीच्यावेळेस आंदोलकांना थांबता येत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. मग पोलिसांनी अटक केली, तरी आंदोलन सुरूच ठेवू, असेही संघटनेने स्पष्ट केले.