नवी मुंबई : बलम पिचकारी... जो तुने मुझे मारी... म्हणत तरुणाई यावेळी धूलिवंदनाला नैसर्गिक रंगांची उधळण करणार आहे. पर्यावरणाची, पाण्याची अपरिमित हानी न होऊ देता आणि नागरिकांना त्रास न देता लहान गोपाळांसह तरुणपिढी रंगात न्हाऊन निघणार आहे. त्यासाठी नवी मुंबईच्या बाजारपेठाही सज्ज झाल्या असून धूलिवंदन अर्थात रंगपंचमीची तयारी जोरोशोरोत सुरू झालेली आहे.धूलिवंदनाच्या दिवशी लहानग्यांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत कुणालाच रंगात न्हाऊन निघायचा मोह आवरत नाही. अशा सर्वांसाठी बाजारपेठेत निरनिराळे नैसर्गिक रंग आणि पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारपेठ, ऐरोली, कोपरखैरणे, सानपाडा, नेरूळ आणि बेलापूर परिसरातील किरकोळ बाजारपेठा रंगपंचमीच्या साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. बाजारपेठेत लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारातील पिचकाऱ्या विक्रीसाठी आल्या आहेत. त्यात खासकरून चायनामेड पिचकाऱ्यांनी बाजारपेठ काबीज केली असून त्या परवडणाया दरात असल्याने त्यांना मागणीही अधिक आहे. रासायनिक रंगांसोबत नैसर्गिक रंगही बाजारात दाखल झाले आहेत, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नैसर्गिक रंगाना अधिक मागणी आहे. लाल, हिरवा, पिवळा अशा साध्या रंगाचे पॅकेट व सुटे रंगही बाजारात उपलब्ध आहेत.नैसर्गिक रंगांमध्ये ३०० ग्रॅमचे एक पॅकेट ६० रुपयांपर्यंत आहे. रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगाची अधिक किंमत असली तरी ग्राहक पर्यावरणाच्या व त्वचेच्या सुरक्षिततेसाठी नैसर्गिक रंगांचीच खरेदी करीत असल्याचे व्यापारी राजेंद्र सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नागरिकांनी होळी खेळताना रासायनिक रंगांचा वापर करू नये. फक्त नैसर्गिक रंगांचाच वापर करावा. यामुळे त्वचेला हानी पोहोचणार नाही. होळीच्या दिवशी घराच्या बाहेर जाताना केसांना तेल लावावे, चेहऱ्यावर व्हॅसलीन किंवा इतर क्रीम लावावी, हाताची नखे कापावीत व रंग उडविताना कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.- मनज्योत सिंग, त्वचा तज्ज्ञ.
धूलिवंदनात होणार नैसर्गिक रंगांची उधळण
By admin | Published: March 02, 2015 10:49 PM