Join us

मुलांचा नैसर्गिक विकास हा मातृभाषेतील शिक्षणानेच!

By admin | Published: April 20, 2017 3:10 AM

मुलांचा नैसर्गिक विकास हा मातृभाषेतील शिक्षणानेच होतो. तरीही आपण इंग्लिशच्या आहारी का चाललो आहोत? असा परखड सवाल उपस्थित करत ज्येष्ठ पत्रकार राहुल देव

मुंबई : मुलांचा नैसर्गिक विकास हा मातृभाषेतील शिक्षणानेच होतो. तरीही आपण इंग्लिशच्या आहारी का चाललो आहोत? असा परखड सवाल उपस्थित करत ज्येष्ठ पत्रकार राहुल देव यांनी उपस्थितांचे कान टोचले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दिनिमित्त दीनदयाळ समाज सेवा केंद्रातर्फे गोरेगाव पूर्वेकडील पांडुरंगवाडी मैदानात पार पडलेल्या द्वैभाषिक व्याख्यानमालेत ते बोलत होते.देव यांनी ‘भारत की प्रगतीमें भारतीय भाषाओंका स्थान’ या विषयावर विचार मांडून व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले. आपल्या नातवंडांच्या दैनंदिन व्यवहाराची प्रथम भाषा ही मराठी असेल? आणि किती जणांना असे वाटते की आपल्या नातवंडांचे शिक्षण मराठी मध्यमात होईल? या त्यांच्या सुरूवातीच्या दोन प्रश्नांनी आणि त्यांवर मिळालेल्या उत्तरांनी विषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले. साधारणत: अशीच परिस्थिती भारतातील इतर भाषांची असल्याचे त्यांनी नमूद केले. अत्यंत ओघवत्या भाषणात आपला इंग्लिशला विरोध नाही, तर ‘इंग्लिश हीच भाषा’ या प्रवृत्तीला आहे हे देव यांनी स्पष्ट केले. नर्सरीपासून सर्व शिक्षण इंग्लिश भाषेत करण्याच्या उत्तरप्रदेश सरकारच्या निर्णयावर त्यांनी अतिशय कडवट शब्दांत टीका केली. दुसऱ्या दिवशी अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी ‘भारतीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव’ या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले. घैसास यांनी अर्थशास्त्र हा किचकट विषयही सोपा वाटावा, अशा प्रकारे उलगडत नेला. ब्रेक्झिट, डिमॉनिटायझेशन, तेलाच्या किंमती, घसरणाऱ्या रुपयाचे देशांतर्गत अर्थकारणावर होणारे सकारात्मक परिणाम, कर्जमाफीचा भस्मासुर अशा अनेक विषयांवर श्रोत्यांचे प्रबोधन केले. स्वानंद ओक यांनी या सत्राचे सूत्रसंचलन केले. (प्रतिनिधी)