कागदातून उलगडली निसर्गाची अमूर्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:44 AM2019-12-29T00:44:05+5:302019-12-29T00:44:11+5:30
कुलाब्यातील तर्क दालनात निभा सिकंदर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
मुंबई : निभा सिकंदर या कलाकाराने दक्षिण मुंबईच्या तर्क कलादालनात आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर प्रदर्शन आयोजित केले आहे. निभा यांच्या ‘खंडोबाचा घोडा’ अर्थात ‘वॅडरिंग व्हायोलिन मॅटिस’ या पहिल्या प्रदर्शनातून कागदाच्या माध्यमातून निसर्गाची अमूर्तता मांडली आहे. हे प्रदर्शन ४ जानेवरीपर्यंत कुलाबा येथील तर्क कलादालनात रसिकांसाठी खुले राहील. या प्रदर्शनात सिकंदर यांनी निसर्गातल्या, आपल्या भवतालच्या, कल्पनाविश्वातल्या विविध जीवांच्या प्रतिमा कागदाच्या माध्यमातून साकारल्या आहेत. निसर्गातील विविध कीटक आणि पक्षी यांच्या लहान कलाकृती रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
निभा यांनी मुरूड-जंजिऱ्यातील आपल्या स्टुडिओत कागद कातरत विविध पतंग, उष्ण प्रदेशात आढळणारे किडे जसे तनफुगा वा खंडोबाचा घोडा आणि पक्ष्यांचे आकार एकावर एक पदर चढवत अतिशय निगुतीने आणि प्रमाणबद्धतेने साकारले आहेत.
निभाने भवतालच्या विविध किड्यांच्या आणि जीवांच्या केलेल्या निरीक्षणातून हे प्रदर्शन आकाराला आले आहे. लहानपणापासून निसर्गप्रेमी असलेली निभा प्रदर्शनाविषयी सांगते की, कागद निसर्गातील विविधतेचे प्रतिनिधित्व करतो. कागद मऊ, ताठर, लवचीक आणि जो आकार देऊ तो धारण करणारा, जणू पंख, पिसं आणि अँटिनासारखा आहे. ज्या पक्षी वा किड्यांचे ती निरीक्षण करते, त्यांच्या खोलात जात विषयाच्या मुळाचे ती विखंडन करते. प्रत्येक घटकातील अमूर्तता कलाकृतींतून उलगडवून दाखवते.
हवामान बदलाचे वैयक्तिक आकलन
या प्रदर्शनाविषयी कला क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार रणजीत होस्कोटे यांनी सांगितले, अचूक सादरीकरणाने फुललेले आणि हेरण्यास कठीण असलेले नेमके बारकावे बेमालूमपणे टिपणारे सिकंदर यांच्या कलाकृतींतील पतंग आणि पक्षी, निसर्गाच्या जगातील वर्गीकरणाच्या शास्त्राची तेजोमय साक्ष देत आपल्याला प्रफुल्लित करतात. हे केवळ प्रजातींचे सादरीकरण करण्याचा प्राथमिक हेतू न बाळगता भक्षकांच्या धोकादायक जगाचे, प्रवाही, हवामानाच्या बदलांचे अतिशय वैयक्तिक असे आकलन करते.