सोयाबीन कमी उगवण्याला निसर्गही कारणीभूतच; राज्यात अनेक ठिकाणी ९० टक्क्यांपर्यंत उगवण झाल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 03:05 AM2020-07-04T03:05:45+5:302020-07-04T03:05:49+5:30
२०११ मध्ये विविध कारणांनी बियाण्यांच्या कमी उगवणीबाबत तक्रारी होत्या
मुंबई : राज्यात यंदा सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात उगविल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी जोराचा पाऊस झाल्याने अपेक्षेप्रमाणे सोयाबीन उगविले नसल्याचे सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सीयाम) या संघटनेने म्हटले आहे.
सोयाबीनचे बी हे संवेदनशील असते. जोराचा पाऊस आला तरी त्याची अपेक्षेप्रमाणे उगवण होत नाही. तसेच जमिनीत पुरेशी ओल नसल्यास उगवण क्षमता कमी होते. अपुºया ओलाव्यावर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोलवर पेरणी केली. आमच्या सभासद कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की, शेतकºयांनी बियाण्यांच्या सोबत पुरविलेल्या बुरशीनाशकाचा बीज प्रक्रिया करण्यासाठी वापर केलेला नाही. यावर्षी महाबीजसह खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या उगवणीबाबत तक्रारी आहेत. महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा तसेच इतर शासकीय यंत्रणांच्या पूर्ण तपासणीनंतर प्रमाणित केलेले बियाणे प्रयोगशाळेत तपासल्यानंतर बाजारात येतात. याचा अर्थ बियाणे उगवण कमी होण्यामागे गुणवत्ता कारणीभूत नसून नैसर्गिक परिस्थितीमुळे हे घडल्याचे दिसून येते. राज्यात अनेक ठिकाणी ९० टक्क्यांपर्यंत उगवण झाल्याचेही आम्ही केलेल्या अभ्यासात आढळले आहे. त्यामुळे प्रमाणित बियाण्यांना बोगस ठरविता येणार नाही, असेही ‘सियाम’ने म्हटले आहे.
कायद्यानुसार चौकशी होऊ द्या : २०११ मध्ये विविध कारणांनी बियाण्यांच्या कमी उगवणीबाबत तक्रारी होत्या. समितीमार्फत त्याची चौकशी झाली होती. बियाण्यांच्या नाजूक/नाशवंत बाबी, जमिनीत पुरेशी आर्द्रता नसणे, अनियमित पर्जन्यमान आदी बाबी त्यात आढळल्या होत्या. सरकारने पंचनामे करावेत, बियाणे कायद्यानुसार चौकशी करावी, असेही संघटनेने म्हटले आहे.