Join us

निसर्ग चक्रीवादळ : धोक्याच्या अनुषंगाने खबरदारी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:40 PM

अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग नावाचे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईलाही हानी पोहचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

- रुग्णांना पक्के बांधकाम असलेल्या ठिकाणी तातडीने हलवा

- कोविड आरोग्य केंद्रांची संरचनात्मक तपासणी तातडीने करण्याचे निर्देश

- बांधकाम ठिकाणच्या स्कॅफोल्डींगसह इतर साहित्याची मजबुती तपासण्याचे आदेश

मुंबई  : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग नावाचे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळेमुंबईलाही हानी पोहचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना त्रास होऊ नये. ऐनवेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रांची संरचनात्मक तपासणी संबंधित कंत्राटदारांनी त्यांच्या स्तरावर पुन्हा एकदा करुन घ्यावी. आवश्यकता असल्यास तेथील रुग्णांना पक्के बांधकाम असलेल्या ठिकाणी तातडीने हलवावे, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याचबरोबर या अनुषंगाने नागरिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. समुद्रकिनारी जाऊ नये. महापालिकेद्वारे व शासनाने वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे मैदानावर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील समर्पित आरोग्य केंद्रात उपचार घेत असणा-या रुग्णांना पक्के बांधकाम असणा-या ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या इमारत बांधकाम व इतर बांधकामाच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यक ती तपासणी तातडीने करण्याचे व गरजेनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.  प्रामुख्याने बांधकामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या परांची व इतर बांधकाम विषयक बाबींची मजबुती तात्काळ तपासून घ्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. इमारतींच्यावर असणारे क्रेन, लिफ्ट इत्यादींबाबत आणि इतर बांधकाम साहित्याबाबत देखील आत्यंतिक खबरदारी घ्यावी. ते सुयोग्य प्रकारे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थालांतरित करावे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना सुयोग्यप्रकारे राबविण्यासाठी व आकस्मिक बाबी करण्यासाठी आवश्यक तेवढे कर्मचारी अव्याहतपणे कर्तव्यावर ठेवण्याचे निर्देश बांधकाम व्यवसायिकांना / कंत्राटदारांना कळविण्यात आले आहे.

टॅग्स :निसर्ग चक्रीवादळचक्रीवादळमुंबई