Join us

पनवेल आरटीओ परिसरास तलावाचे स्वरूप

By admin | Published: July 29, 2014 1:26 AM

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तळोजा : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सदर इमारतीबाहेर जवळपास एक फूट पाणी साचले असून येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. कळंबोली स्टील मार्केट परिसरामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे. याच इमारतीमध्ये जवळपास तीन बँका व सिडकोच्या स्टील मार्केट कमिटीचे कार्यालयही आहे. या ठिकाणी कामानिमित्त रोज शेकडो नागरिक येत असतात. सदर इमारत खोलगट भागात असल्यामुळे येथे प्रत्येक वर्षी पाणी साचत असते. दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे या इमारतीचा परिसर तलावाप्रमाणे भासू लागला आहे. एक फूट पाणी साचले आहे. इमारतीच्या एका बाजूला रिक्षा व इतर वाहने उभी करून ठेवण्यात आली आहेत. ही सर्व वाहने पाण्यात गेली आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही पाण्यातच त्यांची वाहने उभी करावी लागत आहेत. या ठिकाणी कामानिमित्त येणारे नागरिक व कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. प्रत्येक वर्षी अशी स्थिती होत असताना सिडकोने पाणी साचू नये यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाण्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सिडकोचे कार्यकारी अभियंता किशोर चौधरी यांनी सांगितले की, सदर ठिकाणी पाहणी करून पंप लावून पाणी बाहेर काढले जाईल, असे स्पष्ट केले. (वार्ताहर)