मुंबई : लडाख हे आमचे घर असल्यामुळे तिथला निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. पण, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील लोकांनी त्यांची राहणी साधी ठेवल्यास निसर्ग वाचण्यास नक्कीच फायदा होणार आहे. शहरातून होणाऱ्या कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन कमी झाल्यास गेल्या काही वर्षांत निसर्गात, हिमालयाची झालेली हानी रोखण्यास मदत होईल, असे मत प्रख्यात प्रयोगशील अभियंते सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले. क. जे. सोमय्या महाविद्यालयात ‘मेकर मेला’ या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘मेकर मेला’मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी वांगचुक सोमय्याला आले होते. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात अभिनेता आमीर खान यांनी साकारलेली फुंसूक वांगडू ही व्यक्तिरेखा खूप गाजली. ही व्यक्तिरेखा वांगचुक यांच्यावरून प्रेरणा घेऊन साकारण्यात आली होती. वांगचुक यांना ऐकण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती. वांगचुक यांनी तरुणांच्या मनातील काही शंकाचे निरसनही या वेळी केले. वांगचुक यांनी स्वत:च्या आयुष्याविषयी सांगताना इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना शुल्क भरण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असल्याचे सांगितले. लडाखमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत नापास होण्याचे प्रमाण हे ९५ टक्के इतके होते. त्या वेळी दोष विद्यार्थ्यांचा नाही, तर शिक्षण यंत्रणेत आहे हे लक्षात आले. या विद्यार्थ्यांना शिकवले जाते त्याचा यांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी संबंधच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांसाठी वांगचुक यांनी लडाख येथे शाळा सुरू केली. या शाळेचा अभ्यास, शाळा कशी चालवायची इतकेच नाहीतर ही शाळादेखील विद्यार्थ्यांनीच तयार केल्याचे वांगचुक यांनी सांगितल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. बऱ्याच वर्षांत हिमालय आणि आजूबाजूचा निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत. पण, एकूणच परिस्थितीचा विचार करता यावर सगळ्यांनी मिळून काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत वांगचुक यांनी व्यक्त केले. उच्च अभ्यासक्रमांसाठी एक वेगळे महाविद्यालय काढले पाहिजे. मुलांनी अनुभवातून शिकले पाहिजे. फक्त शाळा, पाठांतर, पुस्तके यापलीकडे गेले पाहिजे; तरच नवीन गोष्टी निर्माण होतील. या शाळेतून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मेकर मेला या फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश हा नवीन संकल्पनांवर काम करणाऱ्या तरुणांना एका व्यासपीठावर आणणे. देशभरातून येथे शंभरहून अधिक ‘मेकर’ सहभागी झाले आहेत. यामध्ये समाजाच्या विविध घटकांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू, यंत्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या फेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील मेकरही सहभागी झाले आहेत.
शहरातल्या लोकांनी साधी राहणी ठेवल्यास निसर्ग वाचेल - सोनम वांगचुक
By admin | Published: January 15, 2017 2:36 AM