Join us  

निसर्गाचा रुद्रावतार; मुंबईला वादळी वाऱ्याचा तडाखा

By सचिन लुंगसे | Published: May 13, 2024 7:01 PM

मुंबई महानगर प्रदेशाला सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाला सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. दुपारी ४ नंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईपासून दक्षिण मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या वादळी पावसामुळे घाटकोपर, वडाळा आणि कांजुरमार्गमध्ये झालेल्या पडझळीमुळे मुंबईचे अतोनात नुकसान झाले. विशेषत: ऐन दुपारी दाटून आलेल्या ढगांनी काळोख केल्यानंतर दाखल पावसात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला; आणि मुंबईकरांना भरलेली धडकी रात्रीपर्यंत कायम होती.

मुंबईकरांची सकाळच मुळात दाटून आलेल्या ढगांनी उजाडली. सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वत्र ढगाळ वातावरण असतानाच त्यानंतर मात्र सर्वत्र लख्ख सुर्यप्रकाश पडला. दुपारची कडकडीत ऊने मावळतीला जाताना मात्र हवामानात झालेल्या बदलाने मुंबईला धडकी भरण्यास सुरुवात झाली. नवी मुंबई, ठाण्यातून हवामान बदलाला सुरुवात झाली. दाटून आलेल्या ढगांनी दक्षिण मुंबईकडे आगेकुच करण्यास सुरुवात केली. वादळी वा-याने मुंबईकडे मोर्चा वळविला असतानाच संपुर्ण मुंबई काळोखात बुडाली. वादळी वारे मुंबईवर घोंगावित असतानाच धूळ वातावरणात मिसळी आणि मुंबईवर धूळीचे वादळ तयार झाले. मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, नाहुर, कुर्ला, घाटकोपर, पवई, सायन, दादर असा रोख करत वादळी वारे दक्षिण मुंबईत दाखल झाले. तोवर मुंबईच्या उपनगरात पावसाने विशेषत: वादळी वा-याने थैमान घातले होते. 

दादरच्या शिवाजी पार्कची धूळ वातावरणात मिसळत असतानाच लालबाग, परळ, वरळीपासून महालक्ष्मी, भायखळा आणि फोर्टपर्यंत सर्वत्र वादळी पावसाने थैमान घातले. वादळी वा-याची तीव्रता वाढत असल्याने गगनचुंबी इमारतीही दिसेनाशा झाल्या होत्या. कधी नव्हे ते वादळ वा-याचे रौद्र रुप पाहिल्याने मुंबईकरांना धडकी भरली होती. झोपड्या, चाळी, इमारतीमधील रहिवासी घाबरून का होईना बाल्कनी, गॅलरी, रस्त्यांवर उतरले होते. दुपारी ४ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपुर्ण मुंबईत वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले होते. सायंकाळी ६ नंतर परिस्थिती पुर्ववत होत असल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात निसर्गाचे रौद्र रुप पाहून मुंबईकरांना कोरोनादरम्यान आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची आठवण झाल्याचे चित्र होते. मान्सून कधी येणारमान्सून दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय, बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि निकोबारच्या बेटांवर १९ मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वा-याने हवेत मोठया प्रमाणावर धूळ उठली होती. पावसासह वादळी वा-यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अंधार पसरला होता. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत होते. - कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, पुणे, भारतीय हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :मुंबईमुंबई मान्सून अपडेट