Join us

बालनाट्य महोत्सवात यापुढे ‘नाट्य जल्लोष’

By admin | Published: June 13, 2015 11:34 PM

ठाणे महापालिकेचा बालनाट्य महोत्सव यापुढे बालनाट्य संस्था आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या नाट्य जल्लोष उपक्रमाला

ठाणे : ठाणे महापालिकेचा बालनाट्य महोत्सव यापुढे बालनाट्य संस्था आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या नाट्य जल्लोष उपक्रमाला जोडून ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी आणि प्रतिभा मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा महापौर संजय मोरे यांनी गुरुवारी गडकरी रंगायतन येथे केली. ते नाट्य जल्लोष या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय गोपाळ होते.ठाण्यातील गरीब वस्त्यांमधून, प्रामुख्याने महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या युवावर्गासाठी नाट्य जल्लोषच्या माध्यमातून वंचितांना रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. वंचित समूहात असलेली अंगभूत प्रतिभा आणि त्यांच्या भावभावना व्यक्त करताना त्यांच्याकडून अजूनही अचूक व संपूर्ण निर्दोष कलाकृती होत नसली तरी त्यांना व्यक्त होण्याची मिळणारी संधीच त्यांना पुढे जाण्यास प्रवृत्त करेल, असे रत्नाकर मतकरी यांनी सांगितले. या वेळी गरीब वस्तीमधील बालकलाकारांनी दोन नृत्ये तर युवा कलाकारांनी चार लघुनाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. किसननगरच्या युवकांनी निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित एक वेगळ्याच दृष्टिकोनातून लिहिलेल्या नाटिकेतून क्रांतिकारक संदेश देण्याचा प्रयत्न केला. बलात्कारित स्त्री आता रडत, घाबरत बसणार नाही. तिचे पावित्र्य बलात्कारामुळे जराही कमी होत नसून या प्रवृत्तीविरुद्ध समाज तयार व्हावा, यासाठी मी काम करेन, असा तिचा निर्धार सर्वांना हेलावून गेला. बलात्कार करणाऱ्या नराधमांना मानसिकरीत्या नामोहरम करण्याची शिक्षा देण्याची अभिनव संकल्पना प्रेक्षकांच्या काळजाला हात घालून गेली. विशेष म्हणजे या नाटिका याच मुलांनी लिहून दिग्दर्शित केल्या होत्या.