नाट्यसंमेलन? छे! निवडणुकीची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:27 AM2018-06-13T06:27:25+5:302018-06-13T06:27:25+5:30

पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी नाट्यसंमेलनाचा वापर करून घेतला जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी या संमेलनाला हजेरी लावणार नसल्याचे जाहीर करत वादाला तोंड फोडले आहे.

Natya Sammelan? Hi! Preparing for elections! | नाट्यसंमेलन? छे! निवडणुकीची तयारी!

नाट्यसंमेलन? छे! निवडणुकीची तयारी!

Next

- राज चिंचणकर
मुंबई : पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी नाट्यसंमेलनाचा वापर करून घेतला जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी या संमेलनाला हजेरी लावणार नसल्याचे जाहीर करत वादाला तोंड फोडले आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकीत परस्परांविरोधात उभ्या ठाकलेल्या ‘मोहन जोशी पॅनल’ आणि ‘आपलं पॅनल’मधील संघर्ष यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला असून या वादाची धग संमेलनात जाणवण्याची शक्यता आहे.
‘मोहन जोशी पॅनल’च्या काही सदस्यांनी या वादाची नांदी करत पहिल्या अंकाचा पहिला प्रवेश रंगवला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माजी कोषाध्यक्षा आणि ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी आतापर्यंत ३० संमेलनांना हजेरी लावली असली; तरी यंदाच्या संमेलनाला अजिबात येणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. याबाबत लता नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीसाठी या नाट्यसंमेलनाचा वापर केला जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
९८ व्या नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांची नावे नसल्याबद्दलही नार्वेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. मग हे नाट्यसंमेलन नक्की कुणाचे आहे, असा प्रश्न विचारत या संमेलनाला उपस्थित न राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झालेल्या लता नार्वेकर यांच्या ही भूमिका मांडणाºया कथित पत्रामुळे या विषयाला वाचा फुटली. पत्रावर त्यांची सही नसली, तरी संपर्क साधल्यावर हे पत्र आपलेच असल्याचे त्यांनी मान्य केले.
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या आणि ज्येष्ठ रंगकर्मी सविता मालपेकर यांनीही या नाट्यसंमेलनाकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकारिणीत जे ठरविले जाते, ते नियामक मंडळाच्या सदस्यांसमोर आणावे लागते आणि त्यावर त्यांची मान्यता घ्यावी लागते. मात्र, आतापर्यंत झालेल्या दोन बैठकांमध्ये ‘६० तासांचे संमेलन’ हा विषय आमच्यासमोर मांडण्यात आलेला नाही, असा आक्षेप मालपेकर यांनी घेतला. तसेच, नाट्यसंमेलन स्थळी आमची वास्तव्याची जी व्यवस्था करण्यात आली आहे, त्यात एका खोलीत चार व्यक्ती राहणार आहेत, असे आम्हाला सांगण्यात आले. निवडणुकीत आमच्याशी ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्यासह आम्ही रूम शेअर कशी करायची, असा प्रश्नही मालपेकर यांनी उपस्थित करून नव्या वादळाला तोंड फोडले.
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे आणखी एक सदस्य व ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विजय गोखले यांनी निमंत्रणे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वर पाठवायची असतील तर निमंत्रण पत्रिका छापण्याची आवश्यकताच काय, असा मुद्दा उपस्थित केला. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणार, अशा यापूर्वी दिलेल्या शब्दाला जागले जात नसल्याची भूमिकाही त्यांनी ठामपणे मांडली. तुम्हाला माणसे उपचार, उपकार की आधार म्हणून हवी आहेत; असा प्रश्न विचारत, क्षमा करणे हे थोरांचे भूषण आहे, अशा कानपिचक्याही वडिलकीच्या नात्याने गोखले यांनी दिल्या.

आरोप बालिशपणाचे:कांबळी

प्रत्येक नागरिक हा नाट्यरसिक आहे. हे संमेलन कोणत्याही एका पक्षाचे नाही. कारण या संमेलनाला विविध पक्षांचे नेते पाहुणे म्हणून येत आहेत. हे संमेलन राजकीय असल्याचा आरोप बालिश आहे. तसे असते, तर ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर, विजया मेहता, सई परांजपे आदी मंडळींनी संमेलनाला येण्याचे टाळले असते. पण तसे झालेले नाही, अशी भूमिका नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मांडली. निमंत्रण पत्रिकेवर कार्यकारिणी सदस्यांची नावे नाहीत; यावर मूळात या सदस्यांनीच आक्षेप घेतलेला नाही. तिथे नावे कुणाची असावीत, हा कार्यकारिणीचा निर्णय आहे. निमंत्रण पत्रिकेवर कुणाची नावे असावीत हे घटनेत लिहिलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. १५ वर्षे कुठल्या नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रम पत्रिका नियामक मंडळात मंजूर केल्या गेल्या आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला. साहजिकच, कार्यक्रमांना नियामक मंडळाच्या मान्यतेच्या आता सुरू असलेल्या आरोपातही तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Natya Sammelan? Hi! Preparing for elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.