खलील गिरकर मुंबई : नौदलाच्या ताफ्यातील विमानवाहू युद्धनौका दुरुस्त करण्याची क्षमता आता मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये निर्माण झाली आहे. देशातील नौदलाच्या मालकीच्या पहिल्या ड्राय डॉकची निर्मिती मुंबईत करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते २८ सप्टेंबरला एका कार्यक्रमात या सेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
सध्या एअरक्राफ्ट कॅरिअर दुरुस्ती करण्याची सेवा केवळ कोचिन शिपयार्डमध्ये उपलब्ध आहे. त्या ठिकाणी नौदलासोबत इतर जहाजांचीदेखील दुरुस्ती केली जाते. मुंबईतील ड्राय डॉक कार्यान्वित झाल्यानंतर या ठिकाणी केवळ नौदलाची कामे केली जातील. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील अधिक कडेकोटपणा येईल. त्याशिवाय सध्या या कामासाठी लागणारी प्रतीक्षा करावी लागणार नाही. ड्राय डॉकची निर्मिती अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली असून, त्यामध्ये पाणी भरण्याची व पाणी घालवण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत लागणारा वेळ निम्म्याने कमी करण्यात यश आले आहे. हे ड्राय डॉक २१८ मीटर लांब व ४५ मीटर रुंद आहे. सन २०१० मध्ये या ड्राय डॉकच्या कामाला प्रारंभ झाला होता. हे काम २०१५ ला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्याला विलंब झाला.
सध्या नौदलाच्या सेवेत ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे. तर कोचिन शिपयार्डमध्ये देशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’च्या निर्मितीचे काम सुरू आहे.ही आहेत ड्राय डॉकची वैशिष्ट्ये
- ड्राय डॉकवर २ छोटी जहाजे पार्क करता येण्यासाठी अतिरिक्त १ किमी लांबीची जागा (बर्थिंग स्पेस) उपलब्ध करण्यात आली आहे.
- ड्राय डॉकच्या निर्मितीसाठी १,३२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकावेळी एक विमानवाहू युद्धनौका ठेवता येण्याची क्षमता आहे.
- मध्यावर एक दरवाजा तयार करण्यात आला असून, त्याद्वारे दोन वेगवेगळ्या लहान जहाजांची दुरुस्तीदेखील एकावेळी करता येणे शक्य होणार आहे.
- या ठिकाणी पाणी भरण्यासाठी ९० मिनिटे तर पाणी सोडण्यासाठी २ तास ३० मिनिटांचा कालावधी पुरेसा ठरणार आहे, अशी माहिती नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मेहुल कर्णिक यांनी दिली.