पर्यावरण रक्षणासाठी नौदलाचा पुढाकार, नौदल तळावर वाहनमुक्त परिसर, ई वाहनांना प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:48 PM2020-06-06T18:48:50+5:302020-06-06T18:50:01+5:30
पर्यावरण रक्षणासाठी भारतीय नौदलाने पुढाकार घेतला असून नौदल तळावर वाहनमुक्त परिसर व ई वाहनांना प्राधान्य देण्याचे धोरण आखले अाहे.
मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी भारतीय नौदलाने पुढाकार घेतला असून नौदल तळावर वाहनमुक्त परिसर व ई वाहनांना प्राधान्य देण्याचे धोरण आखले अाहे. वाहनांच्या इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नौदलाने इंडियन ऑईल सोबत प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून नौदलाच्या वाहनांच्या इंधन वापराबाबत नवीन मानकांनुसार काम केले जाणार आहे. त्यामुळे सध्यापेक्षा कमी प्रदूषण होईल.
नौदलाच्या सर्व जहाजांवर जागतिक नवीन निकष पूर्ण करुन ऑईली वॉटर सेपरेटर, सिवेज ट्रिटमेंट प्लँट कार्यान्वित करण्यात येत आहेत. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी ई वाहनांची संख्या वाढवणे, ई सायकल, ई ट्रॉली, ई स्कूटर यांचा वापर टप्याटप्याने वाढवण्यात येणार आहे. पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी केला जाणार आहे. कार्यालयीन वापरासाठी ई वाहने ई सायकलचा वापर वाढावा असे प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी नो व्हेईकल दिवस सातत्याने साजरा केला जात आहे. तर काही नौदल तळ वाहन मुक्त तळ म्हणून तयार केले जात आहेत. वीजेचा सध्या होत असलेला वापर कमी करण्यासाठी विविध तांत्रिक उपाय योजना आखल्या जात आहेत. अपारंपारिक ऊर्जेला प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकार च्या धोरणानुसार सौरउर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 24 मेगावँटचे अनेक प्रकल्प नौदलाच्या कार्यालयात राबवले जात आहेत. नौदलातर्फे गेल्या वर्षात16 हजार 500 झाडे लावण्यात आली त्यामुळे अंदाजे 330 टन कार्बन डायऑक्साईड कमी झाल्याचा अंदाज आहे.