मुंबई : मुंबई शहराच्या संरक्षणाची जबाबदारी नौदल सांभाळत असल्यामुळे त्यांचा या आर्थिक राजधानीच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने भारत सरकारच्या सेक्युरिटी अॅण्ड ग्रोथ फॉर आॅल म्हणजेच ‘सागर’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आयोजित ‘सागर’ शक्तिप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केल्याचे दीक्षित यांनी सांगितले़ नौदलातील नौका, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे तसेच संरक्षणविषयक बाबींची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. यात प्रामुख्याने युवा आणि विद्यार्थीवर्गाचा सहभाग विशेषहोता.सावरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात असताना सशक्त नौदलाचे पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचा दबदबा जगभरात आहे़ आपल्या सागरी सीमादेखील सुरक्षित आहेत, असे स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी या वेळी सांगितले. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, रायगडचे प्रमुख सुनील पवार यांनी शिवरायांची आरमारविषयी दूरदृष्टी, मोगलांना तसेच समुद्री शत्रूंना नामोहरम करण्याच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, या प्रदर्शनाचे संयोजन केल्याबद्दल विनायक काळे तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.