Join us

मान्सून व चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी नौदलाची मदत पथके सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:26 PM

निसर्ग चक्रीवादळ व पावसाळी वातावरणात उद्भवणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी व आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी भारतीय नौदल सज्ज झाले आहे.

 

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ व पावसाळी वातावरणात उद्भवणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी व आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी भारतीय नौदल सज्ज झाले आहे. नौदलाच्या पश्चिम कमांडचे अधिकारी त्यासाठी तयार असून आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. 

नैसर्गिक आपत्ती मध्ये सर्वसामान्य नागरिकांना आपत्तीमधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी नौदलाची पथके कार्यरत असतात. मदतकार्य करण्यासाठी नौदल नेहमी तत्पर असते.  पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी नौदलाने पूर्वतयारी केली आहे. किनारपट्टी भागात कोणत्याही आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी नौदलाची पूर्ण तयारी आहे. 

मुंबईतील नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाद्वारे राज्यातील भागात पूर आल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी पाच पूर नियंत्रण पथके  व तीन पाणबुड्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. पूर्ण पावसाळी हंगामात ही पथके मुंबईत राहतील.  या पथकांना पूरस्थितीला तोंड देऊन मदतकार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.  कारवार ,गोवा, गुजरात, दमण व दीव येथे नौदलाने आपली सज्जता ठेवली आहे.

मुंबई, गोवा व पोरबंदर येथे नौदलाच्या हवाई स्थानकांवर नौदलाची डॉर्नियर हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आली आहेत.या सर्व ठिकाणी नौदलाचे अधिकारी व राज्य सरकार मध्ये योग्य तो समन्वय ठेवण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी नौदलाच्या या पथकांना सतर्कतेचा इशारा देऊन ठेेवण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये नौदलाच्या पथकांचा यापूर्वी अनेकदा मोठा महत्त्वपूर्ण उपयोग झाला आहे. नागरिकांची पूरस्थितीतून सुटका करायची असेल किंवा त्यांना अडकलेल्या ठिकाणाहून इमारतीच्या छतावरुन बाहेर काढायचे असेल,  नौदलाच्या हेलिकॉप्टर व इतर पथकांनी मोठे योगदान दिले आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमध्ये मुंबई, मुंबई जवळील परिसरात व कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पोचवण्यात ननौदलाची मोठी महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

टॅग्स :निसर्ग चक्रीवादळचक्रीवादळमहाराष्ट्रमुंबई