विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना झाली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 12:40 PM2021-08-05T12:40:57+5:302021-08-05T12:41:59+5:30
Vikrant aircraft carrier: संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. यशस्वी सागरी चाचण्यांनंतर पुढीलवर्षी ऑगस्ट महिन्यात ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना बुधवारी सुरुवात झाली. यशस्वी सागरी चाचण्यांनंतर पुढीलवर्षी ऑगस्ट महिन्यात ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
भारतीय नौदलाने या युद्धनौकेचा आराखडा तयार केला असून कोचिन शिपयार्ड लिमिटेडने याची बांधणी केली. स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका बांधण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी झाला आहे. या विमानवाहू युद्धनौकेबरोबर ७६ टक्क्यांहून अधिक यंत्रणा, साहित्य पूर्णपणे भारतीय आहे. जगात अगदी मोजक्याच देशांकडे विमानवाहू युद्धनौका उभारण्याचे तंत्रज्ञान आणि क्षमता आहे. विक्रांतच्या निमित्ताने भारताचा समावेश या निवडक देशांच्या यादीत झाला आहे. अनेक वर्षांपासून या नौकेच्या सागरी चाचण्यांची वाट पाहिली जात होती. त्यातच कोरोनामुळे त्याला आणखी विलंब झाला. डिसेंबर २०२० च्या अखेरीस युद्धनौकेच्या वहनक्षमतेसह आवश्यक ऊर्जानिर्मितीच्या चाचण्या पार पडल्या. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता सागरी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. या चाचण्या पार पडल्यानंतर नौदलात याचा समावेश केला जाणार आहे.