४० मेट्रिक टन ऑक्सिजनसह नौदलाचे त्रिकंड मुंबईत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:53+5:302021-05-11T04:06:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जगभरातून ऑक्सिजनसह वैद्यकीय उपकरणे भारतात आणण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जगभरातून ऑक्सिजनसह वैद्यकीय उपकरणे भारतात आणण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्रसेतू-२’ला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी आयएनएस त्रिकंड या युद्धनौकेतून ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन आणि अन्य वैद्यकीय साहित्य मुंबईत दाखल झाले.
आयएनएस त्रिकंद या युद्धनौकेतून ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक टँकर साेमवारी नौदलाच्या गोदीत दाखल झाले. ५ मे रोजी करार येथील हमद बंदरातून ही नौका मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. भारतातील कोरोना लढ्यासाठी फ्रान्सने सहकार्याचा हात पुढे केला आहे. त्याअंतर्गत पुढील दोन महिन्यांत ६०० मे.टन द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणले जाईल. त्यातील पहिली खेप आज कतारमधून मुंबईत दाखल झाली.
देशाच्या कोविडविरोधातील लढ्यात सर्वताेपरी मदत करण्याच्या संकल्पाचा नौदलाच्या अधिकाऱ्यांना आज पुनरुच्चार केला. व्हाइस ॲडमिरल आर.बी.पंडित यांनी नौदलाकडून राज्य सरकारकडे हे ऑक्सिजन टँकर सुपूर्द केले. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि फ्रेंच दूतावासातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
.........................