लीनल गावडे, मुंबई‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा’, ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू’ ही गाणी कानावर पडू लागली की, भोंडल्याची तयारी सुरू आहे असे समजावे; कारण नवरात्रीच्या दिवसांत ‘भोंडला’ आवर्जून खेळला जातो. २० ते २५ महिलांचा समूह भोंडला मोठ्या उत्साहात खेळत असतो. सध्या अनेक नवरात्र मंडळांत महिलांचा आणि मुलींचा भोंडल्याचा सराव जोमाने सुरू आहे. भोंडल्याची ही क्रेझ लक्षात घेता अनेक ठिकाणी भोंडल्याच्या स्पर्धादेखील आयोजित केल्या आहेत. आणि या भोंडल्यात पारितोषिक मिळवून देण्यासाठी अनेक डान्स क्लासेससुद्धा सज्ज झाले आहेत.या खेळाला सुरुवात करण्याआधी हत्तीची पूजा केली जाते. आणि मग बायका फेर धरून नाचतात. यात मंगळागौरीप्रमाणेच विविधता आहे. झिम्मा, फुगडी यांचे विविध प्रकार यात सादर केले जातात. गेल्या काही वर्षांत ‘भोंडल्या’लासुद्धा कमर्शिअल रूप आले असून, शहर-उपनगरात बऱ्याच ठिकाणी भोंडला शिकवण्याचे अधिकृत शिक्षण दिले जाते. शिवाय, या भोंडल्यासाठी परिधान करण्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण साड्याही बाजारात उपलब्ध आहेत. विशेषत: भोंडलासाठी नऊवारी साड्या परिधान केल्या जातात. सध्या या प्रकारासाठी ‘रेडी टू वेअर’ साड्याही मार्केटमध्ये आहेत. दादर, परळ, गिरगाव, लालबागमध्ये या साड्या सहज उपलब्ध होतात. ५०० ते ७०० रुपयांपर्यंत काठपदराच्या जुन्या साड्या शिवून मिळतात. तर रेडीमेड साड्या ७००पासून ते २००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.काही वर्षांपूर्वी ठरावीक ठिकाणीच भोंडल्याचे सादरीकरण होत होते. पण हा पारंपरिक खेळ पुढच्या पिढीला कळावा म्हणून पुन्हा या खेळाला जोम आलेला आहे. शिवाय यात व्यायाम आलाच म्हणून महिलांसोबत तरुणीसुद्घा यात आवर्जून सहभागी होताना दिसत आहे. रटाळ वाटणार नाही अशी भोंडल्यांची गाणी दरवर्षी वेगवेगळ्या चालीत येत असतात. यंदाही अनेक ठिकाणी पारंपरिक भोंडल्याच्या गाणीला नव्या चाली दिलेल्या गाण्यांच्या सीडीज् बाजारात मिळत आहेत. काही ठिकाणी भोंडला महिला स्वत: गाणी गाऊन, नृत्य करून सादर करतात, यातही एक वेगळीच मजा असते.
नवरात्रीत भोंडला रंगणार!
By admin | Published: October 12, 2015 5:02 AM