राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह असून मुंबईकर दांडिया रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा प्रशासनानं नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी मुंबईत रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे. सध्या लाऊड स्पीकरवर गाणी वाजवण्यास केवळ रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी आहे. त्यामुळे सर्वत्र लवकर गरबा कार्यक्रम बंद करावा लागतो. मुंबई शहरात चाकरमान्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यात सर्व ठिकाणी गरबा कार्यक्रमांचं आयोजन हे संध्याकाळच्या वेळेत करण्यात येतं. त्यामुळे अनेकांना गरबा खेळता येत नाही. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळं आणि गरबा आयोजन करणाऱ्यांकडून रात्री १२ वाजेपर्यंतच्या परवानगीची मागणी करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनानं आता पत्रक जारी करत मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस म्हणजेच ९, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरु ठेवता येईल. पण आवाजाच्या मर्यादेचं पालन मात्र आयोजकांना करावं लागणार आहे.
शहरी भागातील तरुण-तरणींना कामावरून घरी पोहोचण्यास उशीर होतो. गरबा रात्री १० ते १०.३० पर्यंत संपतो. त्यामुळे त्यांना जास्त वेळ खेळता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून गरबा प्रेमींसाठी आता ३ दिवस १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.