नवतपा : सूर्य डोक्यावर; आता होणार सर्वात जास्त तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:05 AM2021-05-26T04:05:22+5:302021-05-26T04:05:22+5:30

मुंबई : सूर्य हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे उच्च तापमानाचे नऊ दिवस होय. ...

Navatpa: the sun on the head; Now the highest temperature will be recorded | नवतपा : सूर्य डोक्यावर; आता होणार सर्वात जास्त तापमानाची नोंद

नवतपा : सूर्य डोक्यावर; आता होणार सर्वात जास्त तापमानाची नोंद

Next

मुंबई : सूर्य हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे उच्च तापमानाचे नऊ दिवस होय. २५ मे ते ३ जून या दरम्यान नवतपा तापतो तेव्हा मान्सूनचा पाऊस चांगला होतो, असा आजवरचा अभ्यास आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन होताना सूर्य एप्रिल ते जून या तीन महिन्यांत डोक्यावर असतो. म्हणजेच सूर्याची किरणे सरळ आपल्या भूभागावर पडतात. जमीन तापते. हवा तापू लागते. या वेळेस राजस्थान, गुजरातकडून उष्ण वारे विदर्भ, मध्य भारताकडे वाहू लागतात. त्यामुळे उष्ण लहरी येऊ लागतात. परिणामी सर्वात जास्त तापमानाची नोंद होते. मुंबईत दमट हवामान असले तरी उकाड्याच्या रूपाने हवामानातील बदल मुंबईकरांना घाम फोडत असतात.

प्राचीन काळापासून लोकांना हवामानाचा अभ्यास होता. सूर्य, चंद्राचे भ्रमण मार्ग, तारे, ग्रह यांचे वर्षभरातील मार्ग, पावसाचे नक्षत्र आणि अत्याधिक तापमानाचे दिवस याची इत्थंभूत माहिती प्राचीन खगोल अभ्यासकांना होती. नवतपा हे त्यातील एक होय. सूर्य हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपा सुरू होतो. परंतु त्यांनी या ज्ञानाला ज्योतिषाशी जोडले आणि ग्रह, ताऱ्यांचा प्रभाव सांगायला सुरुवात केली, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

अवकाशातील वर्षभराच्या मार्गावर २७ नक्षत्रे येतात. दरवर्षी त्या त्या वेळेस येणारे ऋतू, घडणाऱ्या खगोलीय आणि भौगोलिक घटनांशी प्राचीन लोकांनी जीवनाची सांगड घातली. राशी, नक्षत्राचा प्रभाव आणि परिणाम सांगितला. यातील अवैज्ञानिक भाग सोडला तर प्राचीन लोकांचा निसर्गाचा गाढ अभ्यास निरीक्षण आणि अनुभव यांच्या भरवशावर होता. आजही अनेक खगोल अभ्यासक राशी, नक्षत्राचा संदर्भ म्हणून उपयोग करतात आणि आपण मागील तापमानाचे उच्चांक पाहिले तर नवतपातच सर्वाधिक तापमान ४८ आणि ४९ अंश होते.

Web Title: Navatpa: the sun on the head; Now the highest temperature will be recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.