कहाणी आधुनिक नवदुर्गेची: स्वत:च्या हिमतीवर उभी राहिलेली दामिनी; शुभांगीकडे बसच्या तिकिटाचे पैसे नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 10:10 AM2023-10-15T10:10:24+5:302023-10-15T10:10:49+5:30

प्रसंगी विजेचा शॉकही बसला, मात्र जिद्दच शेवटी कामी आली

navdurga Damini who stood on her own; Shubhangi did not have money for the bus ticket | कहाणी आधुनिक नवदुर्गेची: स्वत:च्या हिमतीवर उभी राहिलेली दामिनी; शुभांगीकडे बसच्या तिकिटाचे पैसे नव्हते

कहाणी आधुनिक नवदुर्गेची: स्वत:च्या हिमतीवर उभी राहिलेली दामिनी; शुभांगीकडे बसच्या तिकिटाचे पैसे नव्हते

- सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरकाम करणारी आई आणि खासगी रुग्णालयात कंपाउंडर असणारे बाबा, शिक्षणात आलेल्या अनंत अडचणी, फी भरायलाही पैसे नाहीत, असे असतानाही स्वत:च्या पायावर-हिमतीवर शिक्षण पूर्ण करून महावितरणमध्ये ‘पॉवर वूमन’ म्हणून कार्यरत असलेल्या शुभांगी अभिमन्यू चोपडे यांनी आज यशाचे शिखर गाठले आहे. विशेषत: विजेसारख्या क्षेत्रात वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जाताना शुभांगी यांनी ग्राहकांशी मैत्रीचे नाते निर्माण केले आहे. 

 महावितरणमध्ये शुभांगी या वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. २७ वर्षांच्या शुभांगी यांनी पत्रकारितेत बी.ए. केले आहे. छत्रपती संभाजीनगरात जन्मलेल्या शुभांगी यांनी प्राथमिक शिक्षण नेताजी सुभाष हायस्कूलमध्ये पूर्ण केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात त्यांनी वीजतंत्री विषयात आयटीआय केला. त्यांची आई घरकाम, तर वडील खासगी दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करीत होते. शालेय शिक्षण घेताना त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी दहावीमध्ये ७५ टक्के गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला.

घर सोडून अनोळखी लोक, अनोळखी परिसर असे सगळे असताना सहकाऱ्यांनी दिलेली साथ त्यांना मोलाची मदत देऊन गेली. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे अनुभव, त्यांनी शिकविलेली कामाची पद्धत कायमच उपयोगात आली. कार्यक्षेत्रात काम करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. थकबाकी वसुली करताना वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, मात्र या सगळ्यांवर त्यांनी प्रेमाने मात केली. ग्राहकांशी सुसंवाद साधला. हे करताना त्यांनी वीज ग्राहकांना आम्हीही माणसेच आहोत, हे पटवून दिले. तुम्हाला अखंड वीज मिळावी, सुरक्षित वीजपुरवठा मिळावा म्हणून वीज कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावत असल्याचे वीज ग्राहकांना पटवून दिले.

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

८ किलोमीटरची शिक्षणासाठी पायपीट
    आयटीआय करताना बसच्या तिकिटाचे पैसे नसताना त्यांना ८ किलोमीटर पायी महाविद्यालयात जावे लागत होते. त्यातही महाविद्यालयात जाण्यास विलंब झाला तर वर्गात प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे मित्रांच्या मदतीने त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत होता.
    प्रात्यक्षिक करताना कित्येक वेळा त्यांना विजेचा शॉकही बसला. शिक्षणात असे अनेक अडथळे आले, मात्र त्यावर मात करीत त्यांनी आयटीआयच्या अंतिम वर्षात ७४ टक्के प्राप्त केले. 
    काही दिवसांतच महावितरणची ॲप्रेंटिससाठीची जाहिरात निघाली. या कंपनीच्या प्रतीक्षा यादीत त्यांचे नाव आले. महावितरणच्या विद्युत सहायक यादीत भांडूप परिमंडळात त्यांची निवड झाली. निवडप्रक्रियेपासून कंपनीत रुजू होईपर्यंतचा काळ अतिशय 
खडतर होता. 

Web Title: navdurga Damini who stood on her own; Shubhangi did not have money for the bus ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.