मुंबई : खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाप्रसंगी १४ श्री सदस्यांचा झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करणार आहे.
दुर्घटनेनंतर विरोधकांकडून वारंवार शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात होते. प्रकार केवळ उष्माघाताने घडलेला नसून याठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. शवविच्छेदन अहवालातही त्यांनी सात तास काहीच खाल्ले नसल्याने तसेच पाणी कमी प्यायल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या सर्वांची दखल घेत राज्य सरकारने गुरुवारी संध्याकाळी चौकशी समितीची घोषणा केली.
भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती सरकारला शिफारशी करणार आहे.
निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी कराखारघर येथील दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यपालांना निवेदन दिले आहे.