मुंबई : देशभरात वेगवान इंटरनेटचे जाळे विणले जात असताना सर्वात वेगवान इंटरनेट कोणत्या शहरात आहे, याचा खुलासा झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या शेजारी वसलेल्या नवी मुंबईमध्ये सर्वात वेगवान इंटरनेट मिळत आहे. यापाठोपाठ हैदराबादचा नंबर लागत आहे. तर भारतात दिवसापेक्षा मध्यरात्रीनंतर इंटरनेटचा वेग वाढत असल्याचे एका पाहणीवेळी आढळले आहे.
ब्रिटनची वायरलेस मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलने भारतातील शहरांमधील इंटरनेट स्पीडवर अभ्यास केला आहे. यानुसार भारतात रात्री 10 वाजता डाऊनलोड स्पीड 3.7 एमबीपीएस आणि पहाटे 4 वाजता चौपट म्हणजेच 16.8 एमबीपीएस एवढा प्रचंड वेग मिळतो. जेवढे नेटवर्क वापरात असेल तेवढाच त्याचा वेग कमी होतो. रात्रीच्यावेळी भारतात फार कमी लोकच इंटरनेट वापरतात. यामुळे वेग वाढतो. तर दिवसा सर्वचजण मोबाईलवर इंटरनेट वापरत असल्याने बँडविड्थ विभागली जाते व इंटरनेटचा स्पीड कमी होतो.
व्यस्त नेटवर्कमध्ये 2.5 ते 5.6 एमबीपीएस वेगइंटरनेटचा वेग प्रत्येक शहरात वेगवेगळा आढळून आला आहे. जेथे व्यस्त नेटवर्क असते तेथे इंटरनेटचा वेग 2.5 ते 5.6 एमबीपीएस एवढा असतो. जेव्हा वापर कमी असतो तेव्हा हाच वेग 9.9 एमबीपीएस ते 19.7 एमबीपीएस एवढा असतो. हा 4 जी चा वेग आहे.
नवी मुंबईत सर्वाधिक वेग; मुंबई पाचव्या क्रमांकावरनवी मुंबई शहरामध्ये 4जी इंटरनेटचा वेग 8.1 एमबीपीएस एवढा नोंदविला गेला आहे. हा भारतातील सर्वाधिक वेग आहे. तर इंदौरमध्ये नेटवर्क व्यस्त नसेल तेव्हा 21.6 एमबीपीएसचा वेग मिळाला आहे. हैदराबाद 7.9 एमबीपीएस, चेन्नई 7.8 एमबीपीएस, कोलकाता 7.8 एमबीपीएस आणि मुंबईचा 7.5 एमबीपीएस एवढा वेग नोंदविला गेला आहे.