Join us

पोलिस कुटुंबीयांच्या कल्याणाचा नवी मुंबई पॅटर्न; शिक्षण, उपचारांसाठी मदत

By नामदेव मोरे | Published: December 29, 2023 10:02 AM

वर्षभरात १६ लाखांचे अनुदान.

नामदेव मोरे, नवी मुंबई :  पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी  आयुक्त मिलिद भारंबे यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. वर्षभरात १६ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून, २६६ जणांना आरोग्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पोलिस कल्याणाच्या या नवी मुंबई पॅटर्नची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राज्यातील पहिला मेळावा नवी मुंबईत पार पडला. पाल्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा एम पोलिस जॉब ॲप हा पहिला ॲपही नवी मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहरातील गुन्हे नियंत्रणात आणण्याबरोबर पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. 

प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणासाठी अनुदान योजना सुरू केली आहे. जवळपास सात प्रकारचे अनुदान देण्यात येत असून वर्षभरात १६ लाख ६३ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. जानेवारीपासून २६६ जणांना आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. 

 वर्षभरात या हेल्पलाइनवर २२२० अर्ज आले आहेत. यामधील २१०४ अर्जांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

 ७६ अर्जांवर कार्यवाही सुरू असून फक्त ४० अर्ज प्रलंबित आहेत. पाल्यांच्या लग्नकार्यासाठी कळंबोलीत लग्नाचा हॉल उपलब्ध करून दिला.

पाेलिसांसाठी विविध उपक्रम :

 दोन ठिकाणी व्यायामशाळा सुरू केली आहे. कळंबोली मुख्यालयात अत्याधुनिक कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले.   मुख्यालयातील अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह, दिवाळी मेळावा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपणाचेही आयोजन केले जात आहे. 

पोलिस कल्याण निधी अनुदान तपशील :

 शिष्यवृत्ती - २ लाख  गर्भवती महिला अनुदान - २ लाख १० हजार  सुदृढ बालिका अनुदान - ६० हजार अंत्यविधी अनुदान - २ लाख १२ हजार  सानुग्रह अनुदान - २ लाख ५६ हजार ४०० शैक्षणिक अग्रीम - २ लाख २५ हजार  वैद्यकीय अग्रीम - ५ लाख  एकूण १६ लाख ६३ हजार ४००

टॅग्स :मुंबईपोलिस