कामोठे : लाल मातीतला आणि मर्दानी खेळ म्हणून ओळख असलेल्या कुस्त्यांचा थरार रविवारी नवी मुंबईसह हजारो कुस्तीशौकिनांनी अनुभवला. निमित्त होेते भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी, हनुमान कुस्ती संघ, कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचे. यामध्ये देशातील नामांकित पैलवान एकमेकांसमोर उभे ठाकले. कुस्ती म्हटले की गावच्या मातीतील रांगडा खेळ. प्रत्येक गावात तरुणांना व्यायाम करण्याकरिता तालमी असायच्या़ आजही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात या मर्दानी खेळाची आवड कमी झालेली नाही. ग्रामीण भागात आजही पैलवान, आखाडा आणि कुस्ती असे समीकरण पाहावयास मिळते. मात्र या भागातून कळंबोली, कामोठे, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली या ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या कुस्तीप्रेमींना आपल्या शहरात किंवा बाजूच्या वसाहतीत कुस्तीचा फड अनुभवता यावा. त्यांना या रांगड्या खेळाची मजा लुटता यावी, या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी परिसरातील पैलवानांना सराव करण्याकरिता कामोठे वसाहतीत तालीम बांधण्याची मागणी सिडकोकडे केली आहे. सुषमा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात लाल मातीत रंगलेल्या या आखाड्याचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कामोठे येथील आर्यन भेळके आणि भोर येथील सुजल भिलारे यांच्यात पहिली लढत झाली. त्यामध्ये यजमान पैलवान भेळके याने भिलारे याला चीतपट करीत आखाडा डोक्यावर घेतला. त्यानंतर कामोठे येथील किसन शेळके आणि बारामती कुस्ती आखाड्यात पटाईत झालेला पृथ्वीराज भांडा यांची रंगतदार कुस्ती झाली. शेवटी भांडा याला नामोहरम करीत शेळके विजयी झाल्यावर कामोठेकरांनी एकच जल्लोष केला.भार्इंदर येथील शंभो जाधव, शित पवार, सूर्यकांत देसाई, जयदीप बडरे (आटपाटी) आणि शुभम वरखडे (कामोठे) यांनी अनुक्रमे नितीश हातमोड (गिरवले), पवन वाघमारे( कामोठे), अमित सावंत (कामोठे), अमर जाधव (भार्इंदर)व रोहित मांजरेकर यांना चीतपट केले. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसतशी कुस्तीतील रंगत वाढत चालली होती. रविवार असल्याने नवी मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर येथून हजारो कुस्तीशौकीन शहरी आखाडा पाहण्याकरिता आले होते.(वार्ताहर)
नवी मुंबईकरांनी अनुभवला लाल मातीचा थरार
By admin | Published: February 02, 2015 2:45 AM