Join us  

नवी मुंबईचा ९६.७३% निकाल

By admin | Published: June 18, 2014 4:06 AM

महापालिका कार्यक्षेत्रामधील ९६.७३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ४७ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील ९६.७३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ४७ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये १३० विद्यालयांमधील १२७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यामधील १२६७९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली असून १२२६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आज १ वाजता निकाल जाहीर झाला असला तरी सकाळी ११ पासूनच अनेकांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर जावून निकाल पाहण्याचा प्रयत्न सुरू केला होता. शहरातील सायबर कॅफेमध्येही विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अनेकांनी मोबाइलवरच निकाल पाहणे पसंत केले. शाळांमधील शिक्षक व इतर कर्मचारीही निकाल पाहण्यासाठी व्यस्त होते. प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल तपासून पहिला नंबर कोणाचा हे ठरविले जात होते. यावर्षी शहरातील ४७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इतर बहुतांश शाळांचा निकाल चांगला लागला आहे. यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. (प्रतिनिधी)