मुंबई : नव्याने काँक्रिटीकरण केलेल्या अंधेरी-कुर्ला रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी अर्धवट काम सोडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जागोजागी भेगा पडल्याने अंधेरी-कुर्ला रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वाहने खड्ड्यात आदळून वाहनचालक व नागरिकांना पाठीच्या मणक्यांचा आजार अलीकडे वाढत आहे. अवघ्या दोन ते चार महिन्यांमध्ये नव्याने बांधलेल्या काँक्रिटच्या रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत, तर काही रस्त्यांवरचे सिमेंट उखडले आहे.
सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंधेरी पूर्व विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी केली.याबाबत महापालिकेच्या के/पूर्व विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील रखडलेले काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल. रस्त्याला विविध कारणांमुळे तडे पडतात. रस्त्यांची स्थिती तपासून तो अगदीच खराब झाला असेल, तर रस्त्याला तोडून पुन्हा नव्याने दुरूस्त करण्याचे काम महापालिका करते.महत्त्वाचा व व्यस्त रस्ताअंधेरी-कुर्ला मार्ग हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या व व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. अंधेरी पूर्वेकडे अनेक महत्त्वाची महाविद्यालये, शाळा, रूग्णालये, सीप्झ, एम.आई.डी.सी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पंचतारांकित हॉटेल्स, कार्यालये, लघुउद्योग, उद्योग वसाहती, धार्मिक स्थळे व मेट्रो रेल आहेत. त्यामुळे दररोज रस्त्यांवर रहदारीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय कामाच्या ठिकाणी पोहोचण्याकरिता असंख्य नागरिक दररोज याच रस्त्यांवरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.