पुण्याच्या ‘ब्ल्यू बेबी’ला नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:29 AM2019-01-31T05:29:52+5:302019-01-31T05:31:02+5:30
मध्य प्रदेशातील महिलेने केलेल्या अवयवदानामुळे तरुणीला नवा जन्म
मुंबई : पुण्याच्या २७ वर्षीय तरुणीला ‘ब्लू बेबी’ हा दुर्मीळ आजार होता. जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच या आजाराचे निदान झाल्यामुळे पालकांनाही मानसिक धक्का बसला होता. या आजाराच्या स्थितीत बाळाच्या हृदयाची अवस्था नाजूक असते. रक्ताभिसरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हृदयातील चार घटक परिपूर्ण नसल्यामुळे ते कमकुवत होते. त्यातून काही वर्षांनंतर हृदय प्रत्यारोपण करावे लागते. त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात या तरुणीला आजाराचा सामना करावा लागला. मात्र, जिद्द ठेवल्यामुळे अखेर या तरुणीने आजारावर मात केली आहे. नुकतेच मध्य प्रदेश येथील महिलेने केलेल्या अवयवदानामुळे या तरुणीला नवसंजीवनी मिळाली आहे.
मुलुंडच्या खासगी रुग्णालयात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या तरुणीला मध्य प्रदेश येथील ३६ वर्षीय महिलेने हृदय आणि फुप्फुस दान केले आहे. मध्य प्रदेश येथील महिलेला अचानक चक्कर आल्याने तिला रुग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र, त्या वेळेस डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर, कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यानंतर अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. या वेळेस मुलुंडच्या रुग्णालयात हे प्रत्यारोपण झाले.
दरम्यान, पुण्याच्या कसबा पेठेत राहणाºया या तरुणीला वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती. तिने केईएम रुग्णालयात प्रवेश घेऊन शिक्षण सुरू केले होते. मात्र, तिच्या तब्येतीमुळे शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर, तिने चार्टड अकाउंटंटचे शिक्षण घेत यश मिळविले. त्या वेळी तिच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झाल्याने डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यानुसार, डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया पार पडली.
रक्ताचा रंग होतो निळा
ब्ल्यू बेबी या आजाराच्या अवस्थेत लहानग्यांच्या हृदयाच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो. त्यानंतर रक्ताच्या रंगावर याचा दुष्परिणाम होऊन निळसर रंग येतो. त्यामुळे ‘ब्ल्यू बेबी’ म्हटले जाते. मात्र आता या तरुणीची प्रकृती स्थिर असून औषधोपचार सुरु आहेत असे डॉ. अन्वय मुळये यांनी सांगितले.