Join us

जप्त केलेल्या डिव्हाइसची क्लोन कॉपी मिळविण्यासाठी नवलखा व भारद्वाज उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा व सुद्धा भारद्वाज यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा व सुद्धा भारद्वाज यांनी एनआयएने जप्त केलेल्या डिव्हाइसची क्लोन कॉपी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एनआयएला शुक्रवारी दिले.

गेल्या महिन्यात भारद्वाज आणि नवलखा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि २० ऑगस्ट रोजी न्यायालयाने एनआयएला याप्रकरणी उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारच्या सुनावणीत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला सांगितले की, एनआयएचे उत्तर तयार आहे, तरीही दोन आठवड्यांची मुदत द्यावी.

न्यायालयाने सिंग यांची विनंती मान्य केली, तर सिंग यांनी आरोपींवर आरोप निश्चित करणार नसल्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. आरोप निश्चित करण्यापूर्वी आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची क्लोन कॉपी देण्यात यावी, अशी मागणी भारद्वाज, नवलखा व अन्य आरोपींनी केली आहे.

वरवरा राव यांच्यावर ६ सप्टेंबरपर्यंत कारवाई करणार नाही

वैद्यकीय जामीन वाढवून मिळावा, यासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणीपर्यंत म्हणजेच ६ सप्टेंबरपर्यंत वरवरा राव यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, अशी हमी एनआयएने उच्च न्यायालयात शुक्रवारी दिली. फेब्रुवारीमध्ये राव यांचा अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता. या जामिनीची मुदत ५ सप्टेंबर रोजी संपत आहे. या जामिनीत वाढ करण्यात यावी, यातही राव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर ६ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.