राणांना जामीन अन् दुसरीकडे पालिकेचं पथक घरी पोहोचलं, अवैध बांधकामाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:34 PM2022-05-04T12:34:22+5:302022-05-04T12:34:53+5:30
'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर आज मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
मुंबई
'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर आज मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. एका बाजूला राणांना कोर्टाकडून दिलासा मिळला असताच दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचं पथक राणांच्या खार येथील निवासस्थानी अवैध बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोहोचलं आहे.
मुंबईतील खार येथे नवनीत राणा आणि रवी राणा यांचं निवासस्थान आहे. या इमारतीत त्यांनी अवैध बांधकाम केलेलं असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. याच संदर्भात पालिकेनं नोटीस देखील राणांच्या फ्लॅटला दिली होती. त्यात ४ मे रोजी दुपारी १२ वाजता पाहणी करण्यासाठी पालिकेचं पथक येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. नोटीसमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेचं एक पथक राणांचं निवासस्थान असलेल्या इमारतीत पोहोचलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यातच राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, जामिनासाठी प्रयत्नशील असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीर अर्जावर सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले होते. मात्र न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या तुरुंगातील मुक्कामात वाढ झाली होती.
राणा दाम्पत्याच्या जामिनावर सत्र न्यायालयाकडून सोमवारी निकाल अपेक्षित होता. मात्र अन्य प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणी आणि त्यामुळे वेळेचा अभाव यामुळे राणांच्या जामिनावर न्यायालयानं सोमवारी निकाल दिला नव्हता. अखेर राणा दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयाने आज निकाल दिला.