मुंबई - महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून देणे व अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी नवनीत फाउंडेशनने शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईत आयोजित या कार्यशाळेत मुंबई आणि परिसरातील वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. मराठी (द्वितीय भाषा) अक्षरभारती विषय शिक्षकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
अमराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी भाषा सुलभ व रंजक पद्धतीने तरीही कृतिपत्रिकेच्या आराखड्यानुसार कशी शिकवावी, विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कशी विकसित करता येईल, याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षकांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. गद्य, पद्य, उपयोजित लेखन, भाषाभ्यास इ. अभ्यासघटकांविषयी तज्ज्ञांनी चर्चा, संगणकीय सादरीकरण, कृतिपत्रिकेचे प्रात्यक्षिक गटकार्य या प्रकारे सत्र मांडणी केली. त्यामुळे वातावरण खेळीमेळीचे राहिले व प्रशिक्षण एकतर्फी न होता शिक्षकांनी मनमोकळेपणे शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले.
नवनीत फाऊंडेशनच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बसंती रॉय म्हणाल्या, “शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शिक्षकांची गुणवत्ता विकसित होऊन ते अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांना शिकवू शकतील. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नक्कीच उंचावेल.”