Navneet Rana: तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणांनी हात जोडले, लिलावती रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 04:22 PM2022-05-05T16:22:58+5:302022-05-05T16:25:24+5:30
नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचा त्रास आणि छातीत दुखण्याचाही त्रास होत असल्याने त्यांना बुधवारीच जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते
मुंबई - शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बुधवारी जामीन मिळाल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आज राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आले. मात्र, नवनीत राणा यांना यांना तुरुंगातून थेट लिलावती रुग्णालयात नेण्यात आले.
नवनीत राणा यांना रक्तदाब, मणक्याचा त्रास आणि छातीत दुखण्याचाही त्रास होत असल्याने त्यांना बुधवारीच जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झाली नसल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आजा राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे, थोड्यात वेळात आमदार रवी राणा हेही तळोजा कारागृहातून बाहेर येतील. त्यानंतर, ते थेट लिलावती रुग्णालयात जाणार असल्याचे त्यांनी निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. नवनीत राणा यांनी तुरुंगातून बाहेर येताच, माध्यम प्रतिनिधींसमोर हात जोडले, यावेळी त्यांनी कुठलाही संवाद साधला नाही.
Matoshree-Hanuman Chalisa row | MP Navneet Rana gets released from Byculla Jail to be taken to Lilavati Hospital in Mumbai, for a medical check-up. pic.twitter.com/2lOfC1yNW9
— ANI (@ANI) May 5, 2022
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज लिलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली. नवनीत राणा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या डॉक्टरांकडून नवनीत राणा यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. रुग्णालयातील उपचारांनंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना घरी आराम करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.
माध्यमांना बोलायचं नाही, अटी व शर्ती
राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत, त्यांचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे. राणा दाम्पत्याला चौकशीमध्ये सहकार्य करावे लागेल. पोलिसांना चौकशीसाठी बोलवायचं असेल तर २४ तास आधी राणा दाम्पत्यास नोटिस द्यावी लागेल. राणा दाम्पत्याला पुराव्यांसोबत कुठलीही छेडछाड करता येणार नाही. तसेच चौकशी सुरू असलेल्या कुठल्याही मुद्द्याबाबत त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कुठलेही प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारू नयेत, अशी माहिती राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिली.
महापालिकेचे अधिकारी घरी पोहोचले
राणा दाम्पत्याचा मुंबई उपनगरातल्या खारमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेनं ठेवला आहे. पालिकेचे अधिकारी आज राणा दाम्पत्याच्या घरी पोहोचले होते. आवश्यक ते मोजमाप घेतल्याचे समजते. येथील घराचे अवैध बांधकाम हटवण्यासाठी मुदत देण्यात येईल. अवैध बांधकाम न हटवलं गेल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल.