मुंबई - खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले. त्यावरून नवनीत राणांचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी चांगलाच समाचार घेतला. नवनीत राणा आपण कोण आहात "सी"' ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. जरा तोंड सांभाळून बोला असा इशारा संजना घाडी यांनी दिला आहे.
शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी म्हणाल्या की, आपला हनुमान चालीसाशी काय संबंध? हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आलं नाही. भाजपाच्या सी, डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं. तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती असा सवाल त्यांनी केला.
तसेच शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली म्हणून उद्धव ठाकरेंचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत अशी टीका करता. पण याच मातोश्रीवर बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदादेखील केली. हे तुमच्यासारख्या "मुंबईची मुलगी' म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी" C" ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे असा टोला शिवसेनेने लगावला.
दरम्यान, कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते. त्यामुळे माझ्या शापामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका. शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या १०० दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांचं नाक कापू असा इशारा शिवसेना उपनेता व प्रवक्ता संजना घाडी यांनी दिला.