मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिकांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. आता सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्याने स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले असून आज सकाळपासूनच राणा कुटुंबीयांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे.
मातोश्रीबाहेर आणि राणा कुटुंबीयांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. त्यानंतर, राणा दाम्पत्याने आज माघार घेतल्याचं समजत आहे. मात्र, अद्याप शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे तैनात आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे अनेक नेते आमदार, खासदारही दिसून येतात. खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि सोशल मीडिया फेम शिवसैनिक नितीन नांदगावकर हेही रस्त्यावर उतरले आहेत.
''मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा विचार त्यांनी करायला हवा, कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत, त्यासाठीच इथे बसलोय,'' असे म्हणत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राणा दाम्पत्यास आव्हान दिलं आहे.
नितीन नांदगावकरांचा इशारा
तुम्ही आमच्यासाठी मातोश्रीच्याबद्दल बोलून दिल्लीकरांना खुश करण्याचं काम ते करत आहेत. मातोश्रीचं नावं घेतलं की दिल्लीकरांकडून संरक्षण आणि प्रसिद्धी त्यांना मिळते हे माहिती असल्यानेच हा स्टंट सुरू आहे. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं थांबलोय. त्यांची हिंमत होणार नाही, पण हिंमत झाली तर त्यांचं जोरात स्वागत करू, असा इशाराच शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी दिला आहे.
आज माघार, उद्या जाणार?
युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतचा दुजोरा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी मातोश्रीवर येणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज ते घराबाहेरही निघू शकले नाहीत. आता, उद्या मातोश्रीवर येणार असल्याची घोषणा त्यांनी केल्याचं समजतंय, असे वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
मातोश्री आमच्यासाठीही देऊळ - राणा
शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच राणा दाम्पत्य यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. यामध्ये सुरुवातीला राणा दाम्पत्य पूजा करताना दिसत होते. त्यानंतर रवी राणा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच "'मातोश्री' हे आमच्यासाठीही देऊळ आहे. आम्ही देखील मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचण्यासाठी निघालोय. पण आम्हाला थांबवलं आणि गुंडागर्दी करून आमच्या घरावर हल्ला होत आहे. पोलिसांना हाताशी धरून मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत" असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.