Join us  

Navneet Rana: तारीख ठरली! राणा दाम्पत्य याच महिन्यात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 8:34 PM

देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर, जरूर माझ्या नावाने मुर्दाबादचे नारे लावावेत, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना खडे बोल सुनावले होते

मुंबई - आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याच्या अमरावतीतील घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. आता, राणा दाम्पत्याने मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा शिवसैनिक विरुद्ध राणा समर्थक यांच्यात रस्त्यावर सामना रंगण्याच शक्यता दिसून येत आहे.

देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर, जरूर माझ्या नावाने मुर्दाबादचे नारे लावावेत, असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना खडे बोल सुनावले होते. हनुमान जयंतीनिमित्त राणा दाम्पत्याने हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार राणा यांनी, संकटमोचक हनुमान आपल्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, त्यादिवशी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करेन, अशा शब्दात शिवसैनिकांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर, आज राणा दाम्पत्यांनी मातोश्रीबाहेर आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. 22 एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला आहे.

अमरावतील येथील राणा कुटुंबीयांच्या घराकडे शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा वळवला होता. मात्र, पोलिसांनी वाटेतच त्यांना अडकवले. त्यामुळे, शिवसैनिकांनी रस्त्यातच राणा दाम्पत्यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. तर, महिलांनी बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला. त्यावेळी, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेच्या आंदोलनात महिला आक्रमक दिसून आल्या. तर, भगवे झेंडे आणि हनुमानच्या वेशभूषेतील व्यक्तीही आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, शिवसैनिकांना रोखण्यासाठी राणा समर्थकही त्यांच्या घराबाहेर उभे होते.  

टॅग्स :नवनीत कौर राणाशिवसेनारवी राणामुंबई