मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा यांचे लेह-लडाखमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून एकमेकांवर शाब्दीक वार करुन शिवसेना विरुद्ध राणा हा वाद महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र, लेह-लडाख दौऱ्यातील त्यांच्या या फोटोंमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यासंदर्भात संजय राऊत आणि नवनीत राणा यांनी मीडियाशी बोलताना हा अभ्यास दौरा होता, तिथं आम्ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपल्याचं त्यांनी म्हटलं. नवनीत राणा यांनी एक किस्सा शेअर करत संजय राऊतांना चिमटाही काढला.
नवनीत राणा यांनी लेह-लडाख दौऱ्यासंदर्भात बोलताना अगोदर मी तेथील सैनिकांचे आभार मानते, असे म्हटले. सैन्याचे जवान 17 हजार फूट उंचीवर राहून देशाच्या सीमांचं संरक्षण करत आहेत. चीनला एक इंचही जमिन भारतीय सैन्यानं घेऊन दिली नाही. तसेच, राऊत-राणा भेटीवरही त्यांनी भाष्य केलं. माझी विचारांची लढाई आहे, ती मी विचारांनी लढणारच असेही त्यांनी म्हटलं.
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, मला वाटतं माझी लढाई हे माझे विचार आहेत. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. ते तिथे आले आहेत म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखं झालं असतं. माझा समजुतदारपणा मोठा आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अन्याय नाही झाला अन्याय तर माझ्यावर झाला आहे. तरी मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. माझी विचारांची लढाई संपलेली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत. त्याविरोधात मी लढत राहणार आहे. तसेच मी त्यांच्याबद्दल जे काही बोलले आहे, त्यावर मी आजही कायम आहे.
तेव्हा संजय राऊतांकडे उत्तर नव्हते
माझ्यासोबत महाराष्ट्रात जे घडलं, जो अन्याय झाला. त्याविरोधात मी 23 तारखेला संसदीय समितीसमोर जाऊन माझा हक्क बजावणार आहे. जे माझ्या विरोधात बोलते त्याच्या सर्वांबाबत मी साक्ष देणार आहे. संजय राऊतांसमोर मला एका मुलीने विचारलं की महिलांना पुढे का येऊ दिलं जात नाही. त्यावेळी मी बोलले की मी आली आहे, मी जेलमध्ये जाऊनही आले, मला जेलमध्ये टाकणारे लोक इथेच बसले आहेत. त्यावर संजय राऊतांकडे काहीच उत्तर नव्हतं. ते फक्त हसले, असा किस्सा नवनीत राणा यांनी लडाख दौऱ्यातील सांगितला
एकाच पंगतीत राणा आणि राऊत
राजकारणात शेवटपर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, आणि कोणीही कोणाचं मित्र नसतं हेच अनेकदा समजून आलंय. कारण, ज्या पक्षाविरुद्ध नेतेमंडळी जोरजोरात आणि मोठी टिका करतात. कालांतराने त्याच पक्षात ते दिसून येतात. आता, काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राणा यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेच्या नादाला लागाल तर 20 फूट खड्ड्यात पुरणार, अशी भाषा केली होती. आता, तेच संजय राऊत आणि आमदार रवि राणा हे एकाच पंगतीत जेवताना दिसले. तर, खासदार नवनीत राणांसोबत संजय राऊतांचे संवाद साधतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
परराष्ट्र व्यवहार समितीचा दौरा
परराष्ट्र व्यवहार समितीचा दौरा गेल्या चार दिवसांपासून लेह आणि लडाखमध्ये होता. यात खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका सदस्याला घेऊन येण्याचीही मूभा असते. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा देखील येथे उपस्थित होते. देशातील एकूण ३० खासदारांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील फक्त तीन खासदार असून यात संजय राऊत, नवनीत राणा आणि प्रकाश जावडेकर यांचा समावेश होता.