मुंबई - अमरावतीच्या खासदार आणि मातोश्रीबाहेर आंदोलन करत हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरलेल्या नवनीत राणा ह्या तुरुंगातून बाहेर आल्यापासून चर्चेत आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लिलावती रुग्णालयात उपचार घेतले. या रुग्णालयातील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर, रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर, शिवसेना आक्रमक झाली असून रुग्णालयात राणा यांना फोटो काढूच कसे दिले असा सवाल शिवसेनेच्या महिला नेत्यांनी केला आहे. त्यावर, आता भाजप आमदारनेशिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Shivsena Manisha Kayande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अति केले का माती होते. तुम्ही जर एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा घेऊन जात असाल आणि चेहरा कॅमेरात यावा यासाठी धडपड करत असाल तर तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे हे महाराष्ट्र चांगल्याप्रकारे ओळखतो" असं म्हणत निशाणा साधला आहे. तर, कायंदे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाबही विचारला. त्यावर, आता भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विटरवरुन संजय राऊत आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो शेअर केले आहेत.
व्हायरल फोटोबाबत काय म्हणाल्या नवनीत राणा
रुग्णालयातील व्हायरल झालेले फोटो आणि एमआरआय स्कॅनच्या रिपोर्टच्या होत असलेल्या शिवसेना नेत्यांकडून मागणीवर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, मला वाटतं की, त्यांची सत्ता आहे. ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. ते माझ्या घरापर्यंत गेले होते. कदाचित ते उद्या लीलावती रुग्णालयाचा तोडण्याचेही आवाहन करू शकतात. त्यांचे क्रूर राजकारण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहे. केवळ नवनीत राणांचे फोटो व्हायरल झाले होते, बाकीच्यांचे नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर हल्लाबोल केला.