मुंबई - जात प्रमाणपत्र प्रकरणी विशेष न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांच्या वडिलांना मोठा धक्का दिला आहे. राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने डिसेंबर महिन्यात फेटाळला होता. तसेच शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. आता, मुंबईतील शिवडी न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केलं आहे.
नवनीत राणा व त्यांच्या वडिलांना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागेल, असे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात दोनदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तर, डिसेंबर महिन्यातही न्यायालयात हजर राहण्याचे बजावले होते. मात्र, ते न्यायालयात हजर न राहिल्याने अखेर शिवडी न्यायालयाने हरभजनसिंग कुंडलेस यांना फरार घोषित केलं आहे.
कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयांचा दंडही बजावला आहे. अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणात सुनावणीबाबत पुन्हा तहकुबी मागितल्याबद्दल विशेष कोर्टाने खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना हा दंड बजावला आहे. तसेच, सुप्रीम कोर्टातील प्रकरण आणि मुलुंड पोलीस ठाण्यातील प्रकरण हे दोन्ही वेगळं असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
दरम्यान, नवनीत राणा ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. राणा या जातीतील नसूनही त्यांनी त्या जातीचा दाखला मिळवत निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी राणा व त्यांच्या वडिलांवर मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.