Navneet Rana Mumbai Police Chitra Wagh Tweet: जेलमध्ये असताना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळाली. कोठडीत पोलिसांनी पाणीही दिलं नाही अन् वॉशरूमही वापरून दिलं नाही, असा खळबळजनक आरोप खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केला होता. या संदर्भातील मुद्द्याची दखल घेण्यासाठी त्यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीलं. या साऱ्या घटनांदरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत नवनीत राणांचे आरोप फेटाळून लावले. त्यावर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी एक ट्वीट केलं.
नक्की काय घडलं?
नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी एक व्हिडीओ ट्विट केला. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसले. त्यांच्यासमोर पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. तसेच, राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पिताना दिसत होते.
चित्रा वाघ मुंबई पोलिस आयुक्तांवर संतापल्या...
त्यावर चित्रा वाघ यांनी भाजपातर्फे उत्तर दिलं. "खा. नवनीत राणा यांची तक्रार सांताक्रूझ पोलीस स्टेशन मधल्या लॉकअपबद्दल आहे आणि मुंबई पोलिस आयुक्त ( @CPMumbaiPolice ) सोशल मीडियावर त्याच्या आधीचा खार पोलीस स्टेशनमधील राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडिओ लोड करतात… आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल आयुक्त साहेब..?", असा थेट सवाल त्यांनी संजय पांडे यांना केला.
दरम्यान, पोलीस ठाण्यात पाणी देण्यात आलं नाही. वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही, असे आरोप खासदार नवनीत राणांकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. यानंतर गृह मंत्रालयाने राज्य सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितला. या घडामोडी सुरू असताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ ट्विट केला. याआधी पोलिसांवर आरोप झाल्यावर अशाप्रकारे सोशल मीडियावर कधीही व्हिडीओ पोस्ट करून स्पष्टीकरण देण्यात आल्याचे दिसले नव्हते अशा चर्चा या ट्वीटनंतर रंगल्या.