Navneet Rana: नवनीत राणांकडून न्यायालयाच्या अटींचा भंग, जामीन रद्द होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 09:28 PM2022-05-08T21:28:32+5:302022-05-08T21:31:16+5:30
हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन.
मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हनुमान चालिसा आणि न्यायालयात दाखल गुन्ह्यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं. त्यामुळे, न्यायालयाने त्यांना जामीन देताना घातलेल्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. तसेच, यासंदर्भात आम्ही उद्या सन्माननीय न्यायालयास ही बाब निदर्शनास आणून देऊ, असेही त्यांनी म्हटले.
हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे. राणा यांना आज लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच, आपल्यावरील गुन्ह्यासंदर्भातही भाष्य केले. त्यामुळे, त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याचे सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी या विधानांची गंभीर दखल घेत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
''आरोपी नवनीत राणा आणि रवि राणा यांनी काही विधाने केल्याचे कळविण्यात आले. त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना घातलेल्या अटी व शर्तींचा भंग होत असल्याचे मला सांगण्यात आले. त्या क्लीप मी पाहिल्या, जामिनाचा जो आदेश आहे, त्यानुसार त्या कोणत्याही साक्षीदारांशी संपर्क साधणार नाहीत. तसेच, या खटल्याशी संबंधित कुठलाही संवाद मीडियाशी साधणार नाहीत. मात्र, त्यांनी न्यायालयाने जी अट व शर्त घातली होती त्या अटीचा भंग केलेला आहे. त्यामुळे, ही बाब आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.
सन्माननीय न्यायालयाने म्हटल्यानुसार राणा दाम्पत्यास घालण्यात आलेल्या अटी व शर्तींचा भंग केल्यास त्यांचा जामीन रद्द करण्यात येईल. त्यामुळे, आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहोत, असेही प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा
मी कोणता गुन्हा केला ज्याची मला शिक्षा मिळाली. क्रूर बुद्धीने महिलेवर, लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात आली. केसवर मी बोलणार करणार नाही. माझ्यावर जो अन्याय झाला, तुरुंगात ते पोलीस ठाण्यात त्यावर मी लवकरच बोलणार आहे. डॉक्टरांनी अर्जंट चेकअप करण्याचे लिहून दिले होते. मी डॉक्टरांना रिक्वेस्ट करून ओपीडीद्वारे उपचार करणार आहे. डॉक्टरांना डिस्चार्ज द्यायचा नव्हता, असे नवनीत राणा म्हणाल्या.