Navneet Rana: राणा दाम्पत्यांने घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, दिल्लीत मिळालं हे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:34 PM2022-05-09T19:34:11+5:302022-05-09T19:36:53+5:30
कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि शर्तींवरुन जामिनावर सुटलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार आणि मातोश्रीबाहेर आंदोलन करत हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरलेल्या नवनीत राणा ह्या तुरुंगातून बाहेर आल्यापासून चर्चेत आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लिलावती रुग्णालयात उपचार घेतले. या रुग्णालयातील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर, रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने आज दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि शर्तींवरुन जामिनावर सुटलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं आता राणा दाम्पत्याविरोधात कारणे द्या नोटीस बजावली आहे. कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्या विरोधात अजमीनपात्र वॉरंट का जारी केलं जाऊ नये? यावर उत्तर देण्यास राणा दाम्पत्याला बजावण्यात आलं आहे. त्यातच, आज राणा दाम्पत्याने दिल्ली गाठली.
ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्ली गाठली आहे. मुंबई पोलीस आणि संजय राऊत यांच्याबाबतची तक्रार दिल्लीत करणार असल्याचं राणा दाम्पत्यानं सांगितलं होतं. त्यानुसार, आज त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यावेळी, अटकेपासून लॉकअपपर्यंत आणि सुटकेपासून रुग्णालायतून घरी पोहोचेपर्यंत घडलेल्या प्रसंगाची इतंभू माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या तक्रारीची दखल घेत माझी संपूर्ण बाजू मांडण्यासाठी मला 23 तारीख देण्यात आली आहे. लोकसभा सदस्यावर झालेल्या अन्यायाबद्दल मी त्यांची भेट घेतल्याचंही राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.