मुंबई - हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबई दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणांनी केली. तर, नवनीत राणा यांनीही मला जीवाची पर्वा नसल्याचे म्हटले. आंदोलक शिवसैनिकांच्या आक्रमतेवरुन त्यांनी गृहविभागाला प्रश्न विचारले आहेत.
गेल्या अडीच वर्षांपासून राज्यावर संकटं येत आहेत. ती दूर व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी असं आवाहन आम्ही केलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा म्हटली नाही. उलट त्यांच्या शिवसैनिकांनी आमच्या अमरावतीमधल्या घरावर हल्ला केला. दगडफेक केली. आमच्या मुंबईतल्या घराखालीदेखील मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमले. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं आमच्या घरावर हल्ले झाले. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व शिवसैनिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राणांनी केली. तर, नवनीत राणा यांनी राज्य सरकार, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची असल्याचं ते म्हणाले. ज्या पद्धतीने अजित पवार विषय मांडतात, चर्चा करतात. त्यानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवेत, असे नवनीत राणाा यांनी म्हटले. त्यासोबतच, शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेवरुन बोलताना राज्य सरकारवर, गृहविभागावर हल्लाबोल केला. शरद पवार यांच्या घरावर चालून गेलेले टेरेरिस्ट नव्हते, ते गरिब 18-20 हजार रुपयांवर काम करणारे कामगार होते. तरीही, त्यांना तुरुगांत टाकण्यात आलं. पण, आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरापर्यंत बॅरिकेट्स तोडून ते घरापर्यंत पोहोचले. मुख्यमंत्र्यांनीच गुंडे पाठवले होते, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
देवासाठी जीव देण्यास आत्तासुद्धा तयार - नवनीत राणा
मी धर्मासाठी लढायला, मरायला तयार आहे. देवासाठी माझा जीव जात असेल तर उद्याऐवजी आत्ताच माझा जीव गेला तरी मला पर्वा नाही. मी कुणालाही घाबरत नाही. घाबरत असते तर मी अमरावतीहून मुंबईला आले नसते. केवळ राज्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुरळीत पार पडला, त्यास गालबोट लागू नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. आम्ही मातोश्रीवर पोहोचलो नसलो तरी, अनेक हनुमानभक्त तिथे पोहचले, त्यांनी हनुमान चालिसा म्हटली, हेच आमच्या आंदोलनाचं यश आहे, असेही राणा यांनी म्हटलं.
शिवसैनिक आक्रमक
मातोश्री आमच्यासाठी मंदिर आहे. त्या मंदिराकडे बोट दाखवणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना प्रसाद देणारच, असं मातोश्रीबाहेरील महिला शिवसैनिक म्हणाल्या. राणा दाम्पत्याला कोणी सुपारी दिली आहे, ते सगळ्यांना माहीत आहे. सुपारी देता येते, तशीच ती परतही घेता येते. उद्या मोदी मुंबईत येणार आहेत. म्हणून कदाचित सुपारी परत घेतली असावी, अशा शब्दांत महिला शिवसैनिकांनी राणांचा समाचार घेतला.