मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दाम्पत्य शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या मतावर ठाम आहेत. त्यामुळे, सकाळपासूनच मुंबईत गोंधळ सुरू असून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आम्ही महाप्रसाद घेऊन आलाोय, त्यांना देणारच, असे म्हणत काही शिवसेना नेतेही रस्त्यावर उतरले आहेत. या गोंधळावरुन भाजपने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे. त्यावरून मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसैनिक यांच्यात सुरू असलेला गोंधळ पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, राणा दाम्पत्यानेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुनच शिवसैनिक येथे एकत्रित जमा झाल्याचा आरोप केला आहे. भाजपनेही राज्य सरकारवर गंभीर आरोप केले असून महाराष्ट्रात अराजकता निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी नवनीत राणा यांच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांच्या आक्रमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावर, राज्य सरकार आणि पोलिसांची मिलिभगत असल्याचं आरोप त्यांनी केला. खासदार शरद पवार यांच्या घरावर चालून जाणाऱ्यांसाठी वेगळा न्याय, आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरावर येणाऱ्यांसाठी वेगळा न्याय का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. पक्षपातीपणासाठी कायदा आंधळा झाला आहे. पोलीस खात्याकडून, गृहविभागाकडून पक्षपातीपणा होत असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. धनंजय मुंडेंच्या व्यक्तीगत आयुष्यात वेगळा न्याय, आणि गणेश नाईक यांच्यासाठी वेगळा न्याय, असा सवाली शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मनसेनंही केली टिका, दोन खासदारांच्या घरावर हल्ला
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हल्ला चढवला आहे. "तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब???", असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर, "शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे. एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत," असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले शिवसैनिक
राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल शिवसैनिकांची भेट घेतली. यानंतर रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. मध्यरात्रीपासूनच शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर गर्दी जमा झाल्याचे सांगितले जात आहे.