Join us  

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 8:07 PM

Navneet Rana Meets Devendra Fadnavis: नरेंद्र मोदी यांना अमरावतीमधून जागा देऊ शकली नाही, ती खंत आयुष्यभर माझ्या मनात राहणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Navneet Rana Meets Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीत भाजपातील दिग्गज उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. त्यातील एक नाव म्हणजे नवनीत राणा. मागील लोकसभेत नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती अन् त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना पक्षाची उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर नवनीत राणा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत नवनीत राणा यांनी सविस्तर सांगितले.

बच्चू कडू महायुतीचा एक भाग असले तरी या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. याबाबत बोलताना नवनीत राणा यांना विचारले असता, कोणावर काही बोलणार नाही. माझे काम जनतेसाठी करते. कोणत्या नेत्यासाठी करत नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये जे काही घडले, माझे इलेक्शन लोकांच्या विश्वासावर लढवली. दुसऱ्या कोणाच्या भरोशावर निवडणूक लढली नाही. माझे नेते अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी माझ्यासोबत होते. ते सर्व जनतेला माहिती आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

निवडणुकीनंतर २३ दिवसांनी भेटले

मी भाजपची कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. लोकसभा झाल्यानंतर आम्ही भेटलो नव्हतो. कशाप्रकारे निवडणूक झाल्या त्या संदर्भात बोलणे झाले. आमची भेट झाली नव्हती म्हणून भेटायला आलो. निवडणुकीत काय झाले ते माझ्या नेत्याला सांगणे. माझ्या जनतेने मला अमरावतीमध्ये थांबवले, ते त्यांना सांगणं मला खूप आवश्यक होते. कुठे काय झाले, माझ्याकडून काय चूक झाली. या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. देवेंद्र फडवणीस यांना भेटून बरे वाटले. निवडणुकीनंतर २३ दिवसांनी त्यांना भेटले, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

दरम्यान, अमरावतीत महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर, त्याच्यावर काहीच भाष्य करणार नाही. माझे जे नेते आहेत ते त्याच्यावर भाष्य करतील. माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. नरेंद्र मोदी यांना अमरावतीमधून जागा देऊ शकली नाही, ती आयुष्यभर खंत माझ्या मनात राहणार आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :नवनीत कौर राणादेवेंद्र फडणवीस