मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसंपर्क अभियाना अंतर्गत मुंबईतील बीकेसी मैदानावर भव्य सभा घेतली. यावेळी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेत्यांनीही पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. तर, हनुमान चालिसा पठण करण्यावरुन शिवसेनेविरुद्ध आक्रमक झालेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत, भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर राणा दाम्पत्यासह किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. तर, औरंगाबादचं संभाजीनगर करायची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असेही ते म्हणाले. आता, नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन पलटवार केला आहे.
औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचं त्यांनी म्हटलं होतं. निवडणुकांपूर्वी तुमच्याच पक्षाच्या अजेंड्यामध्ये संभाजीनगर नामांतराचा मुद्दा होता. पण, सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. मोदींनी 370 कलम हटवून काश्मीरच्या जनतेला न्याय दिला. पण, तुम्ही एका नगराचं नाव बदलू शकत नाहीत. इतके लाचार मुख्यमंत्री आहेत, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यास बाकीचे पक्ष बाजूला हटतील, ते दुसरीकडे जातील हीच भीती त्यांना वाटत आहे, असेही नवनीत राणा यांनी म्हटलं. राणा दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.
दरम्यान, मुंबईतील सभा ही लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले, तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
औरंगाबादमध्ये औवेसींच्या झालेल्या सभेचा उल्लेख करताना भाजपच्या ए.बी.सी. टीमा पुढे केल्या जातात. कुणाला थडग्यावर डोकं टेकायला लावतात, कुणाला घंटा बडवायला दिला जातो, तर कुणाला भोंगा दिला जातो. आमच्या संभाजीनगरमध्ये असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
विदर्भात गेल्याचा एक व्हिडिओ दाखवा
मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे.